क्राईम पेट्रोल पाहून महिलेचा खून

क्राईम पेट्रोल पाहून महिलेचा खून

पुणे : न्यूज नेटवर्क

शितपेयातून महिलेला झोपेचे औषध पाजून तिचा खून केल्याची घटना रविवारी रात्री हडपसरमधील वैदुवाडी परिसरात घडली. खूनानंतर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल चोरून पसार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा यूनिट पाचच्या पथकाने अवघ्या काही तासांच्या आत अटक केली.
'क्राईम पेट्रोल' ही मालिका बघून आरोपीने खून करण्याचा प्लॅन रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

किसन सिताराम जगताप (४६, रा. बेलसर, ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, सुनिता बाळू कदम (४४, रा. वैदुवाडी, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी जगताप आणि मृत महिला कदम हे २००९ पासून एकमेकांच्या परिचयातील आहेत. हडपसर भागात कदम या मोलमजुरीचे काम करायच्या. तर, जगताप हा येथे खासगी गाडी चालविण्याचे काम करीत होता. तेव्हापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते.

या दरम्यान जगतापने महिलेकडे पैशांची मागणी देखील केली होती. ९ तारखेला रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी जगताप महिलेच्या घरी गेला. त्यानंतर तिच्याशी गप्पा मारण्याचे नाटक करून तिला झोपेच्या गोळ्या टाकलेले शितपेय पिण्यास दिले. तिला गुंगी आल्यानंतर तिचे डोके भिंतीला आपटून तिचा खून करून अंगावरील दागिने, मोबाईल, एटीएम घेऊन जगताप तेथून पसार झाला. याप्रकरणी अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.

----------------------------------***--------------------------------------