पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर येणार प्रशासक
अद्यापही निवडणूका जाहीर न झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य यांचा कार्यकाळ संपत आसल्याने पुढील काळात तेरा पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये पुढील निवडणूक होईपर्यंत प्रशासक कारभार पाहणार
पुणे : न्यूज नेटवर्क
पंचायत समित्यांच्या प्रशासकपदी आपापल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तर, जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हेच प्रशासक असणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचे विद्यमान सभापती, उपसभापती आणि सदस्यांचा कार्यकाळ हा आता अवघा दहा तर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अवघा वीस दिवस इतका उरला आहे.
पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या १३ मार्चला तर, जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या २० मार्चला संपुष्टात येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पंचायत समित्यांवर १३ मार्चपासून तर, जिल्हा परिषदेवर २० मार्चपासून प्रशासक येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंचायत समित्यांच्या प्रशासकपदी आपापल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तर, जिल्हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकारी हेच प्रशासक असणार आहेत. यामुळे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेचा प्रशासक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. याआधी आयुष प्रसाद यांनी विदर्भातील अकोला जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. त्यांची अकोल्यातून पुणे जिल्हा परिषदेत बदली झाली. आता पुणे जिल्हा परिषद मध्ये त्यांना पुन्हा प्रशासकाची भूमिका निभवावी लागणार आहे.
पंचायतराज संस्थांना अधिकाधिक स्वायत्तता देण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने ७३ वी घटनादुरुस्ती केली आहे. या घटनादुरुस्तीतील नियमांची अंमलबजावणी १९९४ पासून केली जात आहे. या घटनादुरुस्तीतीमधील तरतुदीनुसार पंचायतराज संस्थांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेण्याचे बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना मुदतवाढ देता येत नाही.
-------------------------------------------------------------------
