आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जनावरे ठार

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जनावरे ठार

आंबेगाव : न्यूज नेटवर्क

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वेगवेगळ्या तीन गावांत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक गोऱ्हा (बैल), एक कालवड व एक मेंढी ठार झाली आहे. सध्या ऊसतोड जोरात सुरु असल्याने सैरभैर झालेले बिबटे मानवी वस्तीत घुसू लागले आहे.

भक्ष्याच्या शोधात पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धामणी येथील धनगरदऱ्यात बिबट्याने योगेश नानाभाऊ जाधव यांच्या दोन वर्षाचा गोऱ्हा (बैल) वर हल्ला करून ठार केले. शेजारील पोंदेवाडी गावात पडवळवस्तीवरील नीलेश चिमाजी पडवळ यांच्या गोठ्यातील कालवडीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. जारकरवाडी येथील ढोबळेमळ्यात बिरा नारनार भागवत यांच्या मेंढ्याच्या वाड्यावर हल्ला करून बिबट्याने एक मेंढी ठार केली आहे.

तिन्ही घटनास्थळी जाऊन वनरक्षक सोपान अनासुणे यांनी पंचनामा केला आहे. दरम्यान, वनविभागाने तिन्ही ठिकाणी पिंजरा लाऊन बिबट्याला पकडावे, अशी मागणी धामणीचे सरपंच सागर जाधव, वामन जाधव, सोमनाथ जाधव व पोंडदेवाडीचे नीलेश पडवळ यांनी केली आहे.

-----------------------------------------------------------------