खेड - आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीत बिघाडी ?
महाविकास आघाडी आणि महायुती पक्षात झालेली बंडखोरी थांबविण्यात पक्षाचे वरिष्ठ नेते यशस्वी होणार का..?

Special Report | महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाला गेल्याने या पक्षाचे बाबाजी काळे हे अधिकृत उमेदवार आहेत.मात्र आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार व माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व सुधीर मुंगसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आघाडीत बिघाडी होऊन बंडखोरीचे ग्रहण लागले.तसेच महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते आहेत.येथेही महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने येथेही बंडखोरी झाली.परंतु जाधव यांनी ऐनवेळी महाराष्ट्र स्वराज्य पार्टी मध्ये प्रवेश केला. बंडखोरीचे लागलेले ग्रहण महाविकास आघाडी व महायुतीचे बडे नेते कसे शांत करतात हेच पाहणे महत्वाचे आहे.
महाविकास आघाडीकडून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार हा मोठा पेच ताणला गेल्याने अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी काही तास शिल्लक असताना सुटला.अखेर उबाठा सेनेला जागा गेल्याने त्यांनी पक्षाचे बाबाजी काळे यांना उमेदवारी दिली.पण तिकीट न मिळाल्याने निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेले अतुल देशमुख यांनीही शेवटच्या दिवशी प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकावले. त्यांनी काढलेली रॅली नागरिकांचे लक्ष वेधनारी ठरली.
मागील काही दिवसापासून खेड - आळंदी विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमधील कोणत्या पक्षांकडे जाणार आणि कोणत्या इच्छुक उमेदवाराला तिकीट मिळणार याबाबत मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला होता.तिकिट मिळावे म्हणून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाठा पक्षात मोठी स्पर्धा निर्माण झाली.यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचे काही तास शिल्लक असताना देखील उमेदवारी जाहीर होत नसल्याने तालुक्यातील जनताही अक्षरशः संभ्रमात होती.दोन्ही पक्षात ताकदीचे उमेदवार असल्याने तिकीट आपल्याला कसे भेटेल यासाठी सर्वांनी पक्षाचे वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डींग लावली होती. काहींनी तिकीट मिळावे पाण्यात देव ठेवले होते.तर तालुक्यातील काही नेत्यांनी देशमुखांना उमेदवारी न मिळावी म्हणून देखील मोठे प्रयत्न केल्याची चर्चा आहे. शेवटी मतदारसंघ उबाठा सेनेकडे गेल्याने प्रबळ दावेदार असलेल्या बाबाजी काळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली.काळे यांना उमेदवारी मिळाली खरी पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अतुल देशमुख व सुधीर मुंगसे यांची भूमिका काय असेल याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसने देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बाबाजी काळे यांना सगळ्यांची नाराजी दूर करून निवडणूकीला सामोरे जाताना कसोटी लागेल.
महायुतीत खेड आळंदीची जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला गेल्याने आमदार असलेले दिलीप मोहिते उमेदवार आहेत.परंतु महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हा संघटक अक्षय जाधव यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत देखील बंडखोरीचे ग्रहण लागले.जाधव हे देखील माघार घेणार नसल्याचे त्यांचे कट्टर कार्यकर्ते बोलत आहेत.यामुळे खेड आळंदी मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती पक्षात झालेली बंडखोरी थांबविण्यात पक्षाचे वरिष्ठ नेते उमेदवारी अर्ज माघारी पर्यंत कशा पद्धतीने हा तिढा सोडविन्यात यशस्वी होतात हे पाहणे पुढच्या काही दिवसात महत्वाचे ठरणार आहे.येत्या २ नोव्हेंबरला अतुल देशमुखांनी कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवल्याने या मेळाव्यात देशमुख काय राजकीय भुमिका स्पष्ट करतात याकडे संपुर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागुन राहिले आहे.