Pune | वसंत मोरेंचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.तात्यांचा मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
पुणे : पुण्यातील राजकारणात दबदबा असणारे, कायम हटके स्टाईलने आंदोलन करणारे, पुणे जिल्ह्यातील मनसेचे प्रमुख नेते वसंत तात्या मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा ..., असं म्हणत मनसेला रामराम करत असल्याचं वसंत तात्या मोरे यांनी ट्विट करत सांगितलं आहे. आज सकाळीच वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला आहे.
वसंत मोरे हे पुण्याच्या राजकीय वर्तुळातील महत्वाचे नेते आहेत. मनसेच्या मोजक्या नेत्यांमध्ये वसंत मोरे यांचा उल्लेख व्हायचा. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी वसंत मोरे इच्छूक आहेत. राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्या वारंवार भेटीही झाल्या आहेत. मात्र मनसेकडून मोरेंना उमेदवारी दिली जाणार की नाही? याची चर्चा सुरु असतानाच त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वसंत मोरे यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल? ते कोणत्या पक्षात जाणार? हे पाहणं महत्वाचं असेल.
वसंत तात्या मोरेंच राजीनामा पत्र....
विषयः माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.
आपणांस सप्रेम जय महाराष्ट्र..! पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून 'कोंडी' करण्याचे 'तंत्र' अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती.
धन्यवाद..!
आपला विश्वासू,
वसंत (तात्या) मोरे
कात्रज पुणे.
