Khed accident | खेड तालुक्यातील माय-लेकाचा लोहमार्ग ओलांडताना रेल्वेच्या धडकेत मृत्यू
चार दिवसांपूर्वी अंत्यविधीसाठी गावाला गेलेले कुटुंब शिरोलीला परतत असताना दुर्दैवी घटना
महावार्ता लाईव्ह | कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ व २ मधील लोहमार्ग ओलांडताना रेल्वेच्या धडकेत एका ३० वर्षीय महिलेचा आणि तिच्या केवळ ४ वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे सुमारे ६.४० ते ६.४५ च्या सुमारास घडली.
मृत पावलेल्या महिलेचे नाव कविता अर्जुन चव्हाण (३०) तर मुलाचे नाव आरव अर्जुन चव्हाण (४) असे आहे. दोघेही मूळचे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वसंतराव नाईक नगर येथील रहिवासी होते. गेल्या दहा वर्षांपासून हे कुटुंब खेड तालुक्याच्या शिरोली (ता. खेड) येथे स्थायिक झाले होते.
काय घडले?
चार दिवसांपूर्वी नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी हे कुटुंब मूळ गावी गेले होते. सोमवारी पहाटे ते पुन्हा शिरोलीला परत येत होते. कासारवाडी स्थानकावर उतरल्यानंतर त्यांना स्थानकाबाहेर जायचे होते. त्याचे पती लघुशखेसाठी पुढे गेले होते.
त्याचवेळी कविता, त्यांचा चार वर्षांचा मुलगा आरव आणि ११ वर्षांचा मोठा मुलगा विराज (इयत्ता ५ वी) हे तिघे लोहमार्ग ओलांडत होते. विराज हा मुलगा आधीच पलीकडे पोहोचला होता, मात्र कविता आणि आरव यांच्यावर मात्र वेगाने येणाऱ्या मालगाडीच्या इंजिनची धडक बसली. दोघांनाही गंभीर जखमा झाल्या. स्थानकावरील रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी तात्काळ मदत केली, पण दोघांनाही रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला.
कुटुंबाची पार्श्वभूमी
अर्जुन चव्हाण हे खासगी कंपनीत काम करतात. कविता या गृहिणी होत्या. त्यांचा मोठा मुलगा विराज शिरोलीतीलच शाळेत इयत्ता पाचवीत शिकत आहे. लहान मुलगा आरव मात्र घरीच होता. चार दिवसांपूर्वी गावाला गेलेले हे कुटुंब आता केवळ दोघांचे पार्थिव घेऊन परतले.
शेवटचा निरोप
दुपारी पिंपरीतील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात कविता व आरव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक नातेवाईक, शेजारी आणि स्थानिक नागरिकांनी शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. अनेकांनी या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली.
