Khed zp Election | पिंपळगाव-मरकळ जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत ! विजयसिंह शिंदे पाटलांच्या हाती मशाल
मशाल पेटणार की विझणार ? ; मोहिते पाटलांचं घरचं मैदान | शिंदे गटाची संघटना आणि उद्धव गटाची पारंपरिक निष्ठा
महावार्ता लाईव्ह | जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा नामनिर्देशनपत्र भरण्याचा शेवटचा दिवस जवळ येत असताना खेड तालुक्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेल्या शेलपिंपळगाव-मरकळ जिल्हा परिषद गटात राजकीय चित्र एकदम बदलले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची (मशाल) निवड करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वपक्षीय आघाडीचे प्रयत्न फोल
विजयसिंह शिंदे पाटील यांनी या गटात सर्वपक्षीय आघाडी उभी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले होते. खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता, त्यांना यश मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, शिवसेना शिंदे गटकडून श्रीनाथ लांडे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने सर्वपक्षीय आघाडीचे स्वप्न भंगले. यामुळे शिंदे पाटील यांना स्वतंत्र लढत देण्याचा मार्ग निवडावा लागला.
विजयसिंह शिंदे पाटील हे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विराजमान आहेत. यापूर्वी झालेल्या बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीत त्यांनी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना शह देत सर्वपक्षीय बळ गोळा करून विजय मिळवला होता. मोहिते पाटील हे खेड तालुक्यातील प्रभावशाली नेते असल्याने, बाजार समितीच्या या विजयाने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आता जिल्हा परिषद निवडणुकीत मोहिते पाटील 'वाचपा' काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट
विजयसिंह शिंदे पाटील यांनी खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची (मशाल) हाती घेतली आहे. यामुळे या गटात आता स्पष्ट तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
▪️शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट : विजयसिंह शिंदे पाटील▪️शिवसेना शिंदे गट : श्रीनाथ लांडे▪️राष्ट्रवादी अजित पवार गट : शरद मोहिते
या तिन्ही उमेदवारांमुळे शेलपिंपळगाव-मरकळ गटातील निवडणूक अत्यंत रोमांचक आणि चुरशीची ठरणार आहे. स्थानिक मतदारांमध्ये चर्चा आहे की, मोहिते पाटलांचा प्रभाव, शिंदे गटाची संघटना आणि उद्धव गटाची पारंपरिक निष्ठा यामुळे मतविभागणी होऊ शकते.
मशाल पेटणार की विझणार ?
विजयसिंह शिंदे पाटील हे बाजार समितीतील यशस्वी नेतृत्व आणि सर्वपक्षीय बळ गोळा करण्याचे कौशल्य यामुळे मजबूत उमेदवार मानले जातात. मात्र, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच घरच मैदान असल्याने या गटात मोठी ताकद आणि शिंदे गटाची स्थानिक ताकद यांच्यासमोर त्यांना कठीण आव्हान आहे. ही लढत मोहिते पाटलांची पारंपरिक वर्चस्वाचीही चाचणी ठरणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत असताना या गटातील शेवटच्या क्षणातील घडामोडींमुळे मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मतदानाच्या दिवशी शिंदेची मशाल पेटणार का विझणार ? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
