खेड तालुक्यातील माजी उपसरपंचावर गोळीबार
प्रकृती गंभीर ; दोघे आरोपी गोळीबार करून फरार
Firing on former deputy sarpanch of Khed taluka
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील कोरेगाव बुद्रुक गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश दिलीप कल्हाटकर (वय २६) यांच्यावर गावठी पिस्तूलाने चांदुस गावच्या हद्दीत गोळीबार झाल्याची घटना रविवारी (दि.२५) रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.राजगुरूनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या तीन पथकद्वारे आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती राजगुरूनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.
चांदूस येथे दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास दोन व्यक्तींनी ऋषिकेश कल्हाटकर यांच्यावर गावठी पिस्तुलाने गोळीबार केला. कल्हाटकर यांच्या पाठीत गोळी लागली आहे.प्रथम उपचारासाठी राजगुरूनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये आणले होते.मात्र प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी चाकण येथील केअरवेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.गोळीबार केल्यावर दोघे आरोपी फरार झाले आहेत.भर दिवसा झालेल्या गोळीबारामुळे चांदूससह परिसरातील गावचे नागरिक हादरले आहे.
यबाबतची फिर्याद स्वतः ऋषिकेश कल्हाटकर यांनी दिली. ऋषिकेश कल्हाटकर यांच्यावर पाच जणांच्या टोळक्यापैकी दोघांनी गोळीबार केला.राजगुरूनगर स्टेशनमध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल झाला.आरोपींचा शोध पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एन.काबुगडे करीत आहे.
