आढळराव पाटील यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ; राष्ट्रवादी पक्षप्रवेश झाला

आढळराव पाटील यांच्या प्रवेशावेळी आमदार दिलीप मोहिते यांची अनुपस्थिती ; मोहिते पाटील यांना यायला उशीर आगमन होताच उपस्थितांकडून टाळ्या

आढळराव पाटील यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ; राष्ट्रवादी पक्षप्रवेश झाला

राजगुरुनगर : शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे.आढळराव पाटील यांच्या बरोबर सौभाग्यवती कल्पना आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे,सुनील बाणखिले शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अशोक भुजबळ, प्रकाश वाडेकर तसेच असंख्य कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार अतुल बेनके,जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते.

 

आढळराव पाटील यांच्या प्रवेशावेळी आमदार दिलीप मोहिते यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनला.आमदार दिलीप मोहिते पाटील यांना यायला उशीर झाला. परंतु प्रदेशाध्यक्ष अजित तटकरे यांचे भाषण सुरू असतानाच आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे आगमन झाले. याची दखल चालू भाषणात तटकरे यांनी घेतली.

 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रवेशावेळी आढळराव पाटील यांच्या गळ्यात पक्षाचे उपरणे व हातात घड्याळ देऊन पक्षात स्वागत केले. शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील अशी लढत आता बघायला मिळणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर आगामी निवडणुकीत पुन्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील अशी लढत बघायला मिळणार आहे.