Dilip mohite : shivaji aadhalrao | आमदार मोहिते पाटील यांची माजी खासदार आढळराव पाटील यांनी घेतली भेट
आमदार दिलीप मोहिते पाटलांचा विरोध मावळणार का ? आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी कडून उमेदवारीसाठी मार्ग सुखकर होणार का ?
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी आढळराव पाटील यांची सदिच्छा भेट
राजगुरुनगर | शिरूर लोकसभेला राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळण्यासाठी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे नाव चर्चेत असताना राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विरोध केला होता.अशातच शनिवारी शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite patil ) यांच्या निवासस्थनी सदिच्छा भेट घेतली. यामुळे आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे का मोहिते पाटील यांचा विरोध मावळला का या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता पुढील काळात दोन्ही पाटील एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
मंचरमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) मेळाव्यात आमदार दिलीप मोहिते पाटील हे अनुपस्थित राहिल्याचं दिसून आलं. आढळरावांचा (Shivajirao Adhalrao Patil) राष्ट्रवादीतील प्रवेश आणि त्यांना शिरूरची उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चेनंतर आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite patil ) नाराज असल्याचं दिसून आले होते. मोहिते पाटीलांच्या गैरहजरीमुळे नाराजीनाट्याची चर्चा रंगली होती. मविआचे सरकार असताना सर्वाधिक बिघाडी शिरूर लोकसभेत पाहायला मिळाली होती.शिवाजी आढळराव आणि दिलीप मोहितेंमधील संघर्ष तेव्हा राज्याने पाहिला होता.मोहिते पाटील हे आढळराव पाटील पाटलांचे कट्टर विरोधक समजले जातात.
काय म्हणाले होते आमदार दिलीप मोहिते पाटील...
आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite patil ) म्हणाले, आयुष्यभर आम्ही त्यांना विरोध केलेला आहे. राजकारण करण्यापेक्षा घरी बसू. राजकारण तत्त्वाकरिता व्हायला हवं. आयाराम गयाराम असे राजकारण झाले तर त्याला काही अर्थ उरणार नाही. तसे राजकारण मला करायचे नाही. पक्ष त्यांचे स्वागत करेल. तो पक्षाचा निर्णय असेल पण वैयक्तिक जीवनात काय करायचे हा अधिकार मला आहे. ज्यांनी मला जेलमध्ये बसवण्यापासून, आयुष्यातून उठवण्यापर्यंत भूमिका घेतली असेल त्यांच्यासोबत काम करायचे की नाही हा माझा निर्णय असेल. पक्ष स्वागत करेल. मात्र, माझा त्यांना विरोधच असेल. माझा निर्णय ठाम आहे. माझे वैयक्तिक मत असे की, मी गेल्या २० वर्षांपासून त्यांच्याशी संघर्ष करतोय. त्यांनी अतिशय खालच्या पातळीचं राजकारण माझ्यासोबत केले आहे.
