आंबेठाण ग्रामपंचायतीचा कारभार पती-पत्नी च्या हातात ; पती उपसरपंच तर पत्नी सरपंच
उपसरपंच पदी दत्तात्रय नाईकनवरे यांची बिनविरोध निवड व
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील स्मार्टग्राम आंबेठाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्तात्रय पांडुरंग नाईकनवरे यांची निवड बिनविरोध करण्यात आली.पत्नी संघमित्रा नाईकनवरे आंबेठाण ग्रामपंचायतीच्या सरपंच असून आता त्यांचे पती दत्तात्रय नाईकनवरे उपसरपंचपदी विराजमान झाल्याने गावचा कारभार आता खऱ्या अर्थाने पती,पत्नीच्या हाती आला आहे.निवडीनंतर गुलाल भंडारची मुक्तपणे उधळण करीत नाईकनवरे सरपंच-उपसरपंच पतीपत्नीची गावातून भव्य मिरवणूक ग्रामस्थांच्या सहभागाने काढण्यात आली.
एमआयडीसी क्षेत्रातील आंबेठाण ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असून तुळसाबाई घाटे यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता.रिक्त उपसरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत सभागृहात बुधवारी (दि.१२) रोजी सरपंच संघमित्रा नाईकनवरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.उपसरपंचपदासाठी दत्तात्रय नाईकनवरे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा सरपंच नाईकनवरे यांनी सदस्यांच्या उपस्थितीत जाहीर केली.खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक झाली.निवडणूकीचे प्रशासकीय कामकाज ग्रामविकास अधिकारी रवींद्र उगले यांनी पाहिले.
निवडणूक प्रसंगी सभागृहात मावळत्या उपसरपंच व सदस्या तुळसाबाई घाटे,दत्तात्रय मांडेकर,शांताराम चव्हाण, लक्ष्मण भालेराव,अमोल दवणे,रुपाली गोणते,अहिल्याबाई पडवळ,रुपाली मांडेकर,ज्योती मांडेकर,आरती आरडे उपस्थित होते.यावेळी माजी सरपंच सुभाष मांडेकर,गणेश मांडेकर,भानुदास दवणे,तंटामुक्तीचे शरद मांडेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.निवडणुकीवेळी महाळुंगे पोलिसांचा बंदोबस्त होता.
