घाटाचा राजा गेला...

बैलगाडा शौकिनांचा सर्वांत लोकप्रिय सप्तहिंदकेसरी मन्याचे निधन ; बैलगाडा क्षेत्रात शोककळा

घाटाचा राजा गेला...

The "King" of Ghat is gone...!

 

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील वाफगाव येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक राजेश वसंतराव जवळेकर यांच्या सप्तहिंदकेसरी मन्या बैलाचे सोमवारी (दि.२६) रोजी निधन झाले. पुणे,अहमदनगर जिल्ह्यातील बैलगाडा मालक व शौकिनांचा सर्वांत लोकप्रिय सप्तहिंदकेसरी मन्या होता.त्याचे निधन झाल्याने महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमीकडून हळहळ व्यक्त होत आहे. मन्याच्या निधनाची बातमी कळताच बैलगाडा मालक,शौकीन यांचे पावले वाफगाव कडे वळली.हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत गोठ्याजवळच्या परिसरात खड्डा खोदून त्याला त्यात ठेऊन त्यावर धार्मिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातल्या बैलगाडा घाटातील सर्वात वेगवान किंग,सप्तहिंदकेसरी,भारतकेसरी, सह्याद्रीकेसरी,१८ वर्षांचा अपराजित योद्धा,खेड तालुक्याचा "मन्याभाई" हरपला आहे.ज्या वयात इतर बैलांना चालता-उठता येत नाही त्या वयात प्रत्येक घाटात स्वता:चे रेकॉर्ड करणाऱ्या मन्याने १२५ मोटर सायकल,५ चारचाकी वाहने,शेकडो चषक,१५०० पेक्षा जास्त फायनल खेळणारा व ८०० पेक्षा जास्त घाटात "घाटाचा राजा" किताब मिळवणारा आणि ज्याची बारी पाहण्यासाठी घाटामध्ये ३-४ लाख गाडाशौकीन जमा होत होती आणि बारी झाल्यावर संपूर्ण घाट खाली होत होता.जिल्ह्यात मन्या बैल प्रसिध्द होता आणि त्याची बारी पाहण्यासाठी घाटात प्रचंड गर्दी होत असायची.

"मन्याभाई" आता पळताना दिसणार नाही. जेव्हा कधी बैलगाडा क्षेत्रावर पुस्तक लिहिले जाईल तेव्हा पहिला धडा तुझ्या नावाचा असेल वाघा.मालकाच,गावाचं व तालुक्याचं आणि पुणे जिल्ह्याच नाव करून गेला तुझ्यासारखा बैल होणे नाही.बैलगाडा श्रेत्रातील कोहिनूर हिरा संपला. अशा शब्दात अनेकांनी मन्याबैला बद्दल श्रद्धांजली व्यक्त केली.

मन्या हा बैल गेली २० वर्ष बैलगाडा घाटात पळत होता.बैलगाडा क्षेत्रातील सर्वोच्च किताब त्याला आतापर्यंत मिळाले होते.बैलगाडा क्षेत्रात बक्षीस मिळवणारा सर्वात श्रीमंत म्हणून त्याची ओळख होती.१५०० पेक्षा जास्त घाटात पाळाला होता.त्याला सप्तहिंदकेसरी,अपराजित योद्धा,खेड तालुक्याच्या बादशाह असे अनेक नावाने संबोधले जायचे.निधनाची बातमी कळतच सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या मोबाईल स्टेटसवर त्याचा फोटो ठेवून त्याला श्रद्धांजली वाहिली. त्याच्यावर अंत्यसंस्कार समयी गाडाशौकीन त्याच्या घाटातील आठवणींना उजाळा चर्चाद्वारे देत होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून शिरूरचे खासदार अमोल कोल्हे,माजी खासदार शिवाजी आढळराव,आमदार दिलीप मोहिते पाटील,आमदार महेश लांडगे,माजी आमदार शरद सोनवणे,भाजपा पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील, मी सेवेकरी सोशल फांडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे,माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे,अतुल देशमुख,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर,राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष राहुल तांबे, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहराध्यक्ष अतिश बारणे,बैलगाडा मालक व बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे आदींनी श्रद्धांजली वाहिली.