Chakan MIDC | आमच्या अंगावर जेसीबी घाला,रक्ताचे पाट वाहू द्या पण आम्ही जमीन देणार नाही..शेतकऱ्यांची आरपारची भूमिका

एमआयडीसीचे मोजणी अधिकारी तसेच गुंतवणूकदार यांना मूळ जमीन मालकांनी ताबा न देता हुसकावून लावले

Chakan MIDC | आमच्या अंगावर जेसीबी घाला,रक्ताचे पाट वाहू द्या पण आम्ही जमीन देणार नाही..शेतकऱ्यांची आरपारची भूमिका

 

महावार्ता लाईव्ह | एमआयडीसी विभागाने संपादन केलेली जमिनी गुंतवणूकदाररांना  देण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आलेल्या एमआयडीसीचे मोजणी अधिकारी तसेच गुंतवणूकदार यांना मूळ जमीन मालकांनी ताबा न देता हुसकावून लावले.हा प्रकार एमआयडीसी टप्पा क्रमांक दोन मधील भांबोली येथे सोमवारी (दि.३०) रोजी घडला आहे.आमच्या अंगावर जेसीबी घाला,रक्ताचे पाट वाहू द्या पण आम्ही जमीन देणार नसल्याची आरपारची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.


एमआयडीसी टप्पा क्रमांक २ मध्ये भांबोली गाव असून येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी औद्योगिक वसाहतीसाठी संपादन केल्या आहेत.जमीन संपादन केल्यानंतर शेतकऱ्यांनी पेमेंट घेतले आहे.परंतु भांबोली येथील गट नंबर १५१ आणि क्षेत्र अडीच एकर जमीन राऊत कुटुंबाची वडिलोपार्जित आहे.कुटुंब मोठे आणि जमीन कमी तसेच भूमिहीन होणार असल्यामुळे राऊत कुटुंबाने संपादन झालेल्या जमिनीचे पैसे घेतले नाही. आम्हाला जमीन द्यायची नाही आणि आम्ही संपादन जमिनीचे पैसे घेणार नाही.त्यामुळे एमआयडीसीने बळजबरीने संपादन केलेली जमीन आम्हाला द्यायची नाही.एमआयडीसीने आमची जमीन वगळावी,आम्हाला भूमिहीन करू नये.एमआयडीसी पोलीस बळाचा वापर करून आमच्यावर अन्याय करीत आहे. परंतु आम्ही जमीन न देण्याचा भूमिकेवर ठाम असून आमच्या अंगावर जेसीबी घाला आमच्या रक्ताचे पाट वाहू द्या पण जमीनीचा ताबा देणार नाही.एमआयडीसीने टप्पा क्रमांक पाच मध्ये गुंतवणूकदारांना जमीन द्यावी.असे आक्रमक झालेल्या महिला शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


शेतकरी व माजी सरपंच रामदास राऊत,संभाजी राऊत, देविदास राऊत,भास्कर राऊत,तान्हाजी राऊत,सुलोचना राऊत, नंदाबाई राऊत,दगदाबाई राऊत,सुमन राऊत,सुनंदा राऊत,कमल राऊत,विमल राऊत,विक्रम राऊत,विशाल राऊत,राहुल राऊत आदींनी आक्रमक होत जमिनीचा ताबा देण्यासाठी आलेल्या मोजणी अधिकारी व गुंतवणूकदारांना पिटाळून लावले.


भांबोली येथील गट नंबर १५१ क्षेत्र अडीच एकर जमीन एमआयडीसीने संपादन केली.१६ लाख रुपये एकर एकर दराने संपादनाचे पेमेंट शेतकऱ्यांनी घेतले नाही.तसेच खातेदार व त्यांचे वारसांनी संपादनासाठी मान्यता देऊन साह्य केल्या नाहीत किंवा लेखी दिले नाही आणि त्यांच्या नावे पेमेंट देखील आले नाही.  जमीन द्यायची नाही वगळावी म्हणून एमआयडीसी कडे अनेक वेळा शेतकऱ्यांनी लेखी पत्रव्यवहार करून मागणी केली.परंतु एमआयडीसीचे अधिकाऱ्यांनी काहीच कार्यवाही केली नाही.


एमआयडीसीने राऊत कुटुंबाची संपादन केलेली अडीच एकर जमीन सह्यादी सोसायटी व मूनलाईट कंपनीला दिली आहे. गुंतवणूकदार यांना आज एमआयडीसीचे सर्व्हेअर तुषार तांबे व इतर दोन कर्मचारी व पोलीस बंदोबस्तात जमिनीचा ताबा द्यायचा होता.परंतु जमीन मालकांनी ताबा देऊ दिला नाही.एमआयडीसीचे सर्व्हेअर आणि गुंतवणूकदार निघून गेल्यानंतर शेतकरी व पोलीस देखील गेले.मोजणी अधिकारी,गुंतवणूकदार व पोलीस तीन चार तास जमीन परिसरात होते.परंतु जमिनीचा ताबा मिळणार नाही अशी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका बघितल्याने जमिनीचा ताबा देण्यासाठी आलेले मोजणी अधिकारी व कर्मचारी व गुंतवणूकदार निघून गेले.न्यायालयीन लढा लढणार असल्याचे शेतकरी म्हणाले.