बहिणीला त्रास देतो म्हणून भावाने तरुणाचा केला खून
राजगुरूनगर : बहिणीला वारंवार त्रास देतो या कारणावरून चिडून जाऊन भावाने रागाच्या भरात २४ वर्षीय युवकाचा खुन केल्याची खळबळजनक घटना शुक्रवार (दि.४) रोजी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात वाफगाव येथे घडली.
अक्षय रोहिदास मांदळे (रा.वाफगावची मांदळेवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे,तर अभिजित मच्छिंद्र मांदळे (वय २२,रा.वाफगावची मांदळेवाडी) असे खुन करणाऱ्या युवकाचे नाव असुन त्याला खेड पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली आहे.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी अभिजित मांदळे याच्या बहिणीचे लग्न ठरले होते.मयत अक्षय मांदळे हा वारवांर त्रास देत आरोपी अभिजितच्या बहिणीला माझ्याशी लग्न कर असे म्हणत होता.याचा राग मनात धरत चिडून जाऊन अभिजित मांदळे याने शुक्रवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास मांदळेवाडी येथील शेत शिवारात मक्याच्या शेतात अक्षय मांदळे याला गाठून कोयत्याने मानेवर,हातावर सपासप वार केले.या हल्ल्यात अक्षय मांदळे याचा जागीच मृत्यू झाला.
खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील,खेडचे पोलिस निरिक्षक विजयसिंह चव्हाण,पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले,पोलिस हवालदार बाळकृष्ण साबळे यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.पोलीस कर्मचारी कड,गेंगजे, जतकर, सोनुने, कोठावळे,करंडे यांनी आरोपीला तात्काळ पकडले.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. याबाबत मयत मुलाची आई विमल मांदळे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या घटनेचा तपास पोलिस निरिक्षक विजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले करित आहेत.
-----------------------------------------
