Khed | तालुक्यातील राजगुरूनगरजवळ १० वर्षीय मुलीवर अत्याचार; ५५ वर्षीय नराधमाला अटक
राजगुरूनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊलीबाबा भोसले याला अटक केली.
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील राजगुरूनगर जवळील वडगाव पाटोळे येथे १० वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ५५ वर्षीय नराधमाला राजगुरूनगर पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊलीबाबा नामदेव भोसले असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
राजगुरूनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
मंगळवार ( दि. २० मे २०२५) रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीचे वडील घराबाहेर गेले होते. यावेळी मुलगी घरी एकटी असताना आरोपी भोसले याने घरात प्रवेश करून दरवाजाला आतून कडी लावली. त्यानंतर तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने मुलीला दिली. संध्याकाळी मुलीला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर तिने आपल्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिस कारवाई
राजगुरूनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊलीबाबा भोसले याला अटक केली. पोलिस तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सध्या पोलिस पुढील तपास करत असून, आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढती असुरक्षितता
खेड तालुक्यात गेल्या तीन-चार महिन्यांत अशा प्रकारच्या किळसवाण्या गंभीर घटनांमध्ये वाढ झाली आहे. राजगुरूनगर परिसरात वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे मुली आणि महिला असुरक्षित असल्याची भावना स्थानिकांमध्ये पसरत आहे. अशा नराधमांना पोलिस किंवा कायद्याची कोणतीही भीती राहिली नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे.
स्थानिकांची मागणी
या प्रकरणानंतर स्थानिकांनी पोलिस गस्त वाढवण्याची आणि अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळा आणि गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्याची मागणीही केली आहे, जेणेकरून अशा घटनांना प्रतिबंध होईल.
