Khed police | राजगुरूनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी सुभाष चव्हाण यांची नियुक्ती

पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी आपल्या १९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत राज्याच्या विविध भागांत उल्लेखनीय कामगिरी बजावली

Khed police | राजगुरूनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी सुभाष चव्हाण यांची नियुक्ती

Rajgurungar police station appointed police inspector subhash chavan

 

महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी सुभाष सदाशिव चव्हाण यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. २००६ मध्ये पोलिस सेवेत दाखल झालेल्या चव्हाण यांनी आपल्या १९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत राज्याच्या विविध भागांत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद शहर, गोंदिया, ठाणे ग्रामीण, अहमदनगर यांसारख्या विभागांचा समावेश आहे. यापूर्वी ते पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक (बारामती) म्हणून कार्यरत होते.

 

पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी विशेषत: नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल २०१३ मध्ये महाराष्ट्र पोलिस विभागाचे पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांच्या या यशस्वी कारकीर्दीमुळे त्यांच्याकडून राजगुरूनगर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

खेड पोलिस ठाण्यात रुजू झाल्यानंतर चव्हाण यांचे विविध सामाजिक संस्था, स्थानिक संघटना आणि नागरिकांकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे. स्थानिकांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी पाठबळ व्यक्त केले आहे. चव्हाण यांनीही आपल्या कार्यकाळात परिसरातील नागरिकांचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

राजगुरूनगर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करत कायदा-सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, हे त्यांचे प्रमुख ध्येय असेल, असे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले. त्यांच्या अनुभव आणि कार्यक्षमतेच्या जोरावर खेड तालुक्यातील पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.