पिंपरी-पाईट गटातील महिलांनी वांद्रेच्या सहलीचा लुटला आनंद
राजगुरूनगर : खेड तालुक्याचे शेवटचे टोक असलेला वांद्रा गावचा परिसर अतिशय सुंदर,निसर्गरम्य,थंडगार हवेसह निसर्ग सौदर्याने नटलेला आहे.या परिसरात पवित्र भामा नदीचे उगमस्थान आहे.भामेच्या उगमस्थानाला गाणी गात आणि प्रदक्षिणा घालीत वांद्र्याच्या सुंदर निसर्ग परिसरात जवळपास सव्वाशे महिला रममाण झाल्या.

वांद्रा गावच्या सीमेवरून खाली कर्जत तालुका पाहता येतो.वांद्रा गावचा परिसर पर्यटनासाठी खूप सुंदर आहे. भामाई महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत सुनीता बुट्टे पाटील यांनी पिंपरी-पाईट जि.प.गटातील महिलांसाठी आपलं वांद्रे - सुंदर वांद्रे सहल आयोजित केली होती.या सहमीमध्ये जवळपास सव्वाशे पदाधिकारी महिला सहभागी झाल्या होत्या.आपल्याच तालुक्यामधील वांद्रा हे अतिशय सुंदर,निसर्गरम्य आणि थंड हवा असलेलं ठिकाण. परंतु तालुक्यातील हाताच्या बोटावर मोजावे इतके लोक इथे भेट देतात.येथे एकदा आलेला माणूस पुन्हा जात असतो.वांद्रा पर्यटनस्थळ होऊन स्थानिकांना त्यातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी सहलीचे आयोजन केले.

सहलीतील महिलांची जेवणाची व्यवस्था स्थानिक महिलांनी केली.इथल्या स्थानिक महिलांनी अतिशय उत्तम दर्जाचे घरगुती पद्धतीचे जेवण महिलांना दिले.मासवडी, मसालेभात,पुरणपोळी,चिचार्डे भाजी,हुलग्याची शिंगोळी, तांदूळ आणि नाचणीच्या भाकरी,लसणाचा हिरवा लाल खर्डा,काळ्या वालाच्या घुगऱ्या,वालाची आणि गावरान वाटाण्याची आमटी या गावरान प्रकारच्या जेवणावर ताव महिलांनी मनसोक्त मारला.
राजकारणाचे पलीकडे जाऊन वांद्रा पर्यटनस्थळ प्रसिद्ध व्हावे आणि स्थानिक महिलांसह तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आपण काम करणार असल्याचे यावेळी शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.
