Khed crime : राजगुरुनगर एसटी स्टँडवर भरदिवसा चोरी ! ; ५८ वर्षीय महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र एसटी बसमधून चोरले
१ वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगर येथील एसटी स्टँडवरून उंब्रज जाणाऱ्या एसटी बसमध्ये चोरी
महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर बस स्थानकावरून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. दि. १३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगर येथील एसटी स्टँडवरून उंब्रज (ता. जुन्नर) येथे जाणाऱ्या एसटी बसमध्ये ही चोरी झाली.
फिर्यादी छाया सुरेश गायकवाड (वय ५८ वर्षे, रा. उंब्रज नंबर १, तालुका जुन्नर,) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या उंब्रजकडे जाण्यासाठी एसटी बसमध्ये होत्या. बसमध्ये बसलेल्या अवस्थेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे दोन वाट्या असलेले, काळ्या मन्यांमध्ये गुंफलेले मंगळसूत्र चोरून नेले. या मंगळसूत्राची किंमत सुमारे ५०,००० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी खेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. राजगुरुनगर एसटी स्टँड आणि संबंधित बस मार्गावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी, एसटी बस स्टँड आणि सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवाशांनी आपले दागिने व्यवस्थित लपवून ठेवावेत आणि सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.