शिरोली - वांद्रा - पाईट रस्त्याची दुरवस्था | प्रशासनाचे दुर्लक्ष
खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल | वाहनांचे होतेय नुकसान
राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात जाण्यासाठी असलेल्या शिरोली - पाईट - वांद्रा या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्याला जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची अतीशय दयनीय अवस्था झाली आहे.
शिरोली ते वांद्रा हे अंतर जवळपास ५५ किमीचे असून वांद्रा हे गाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शेवटचे टोक म्हणून ओळखले जाते.पावसाळ्यापूर्वी खेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविले नाही.खड्डे बुजविले असते तर आज संपूर्ण मार्ग जागोजागी उखडला नसता.
पाऊस झाल्याने रस्त्याला जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून जाताना प्रवाशी जनता जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. रस्त्याला खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था शिरोली - पाईट वांद्रा या मार्गाची होऊन बसली आहे.या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकीस्वार यांची दुचाकी स्लिप होऊन अपघात झाले आहेत.
चारचाकी प्रवाशी वाहने खड्ड्यामुळे खिळखिळी झाली आहेत.खड्ड्यात वाहने आदळत असल्याने प्रवाशी नागरिकांची हाडे देखील खिळखिळी होत आहेत. खड्ड्यातील रस्त्यावरून प्रवास नको रे बाबा अशी म्हणायची वेळ प्रवाशांवर आली आहे.शिरोली - पाईट - वांद्रा या मार्गांच्या रस्त्याची कामे काही ठराविक टप्पे करून जागोजागी करण्यात आली आहेत.परंतु ज्या ठिकाणी कामे झाली नाहीत तेथील रस्त्याची झालेली दुरावस्था पाहावत नाही म्हणजे रस्त्याने पायी चालणे मुश्किल होत आहे.
शिरोली,लादवड,चांदुस,किवळे,कोये,पाईट,हेंद्रुज,पाळू,टेकवडी, आडगाव,सुपे सातकरववाडी,कोहिंडे,आंबोली,वांद्रा या गावच्या हद्दीतील रस्त्ये संपूर्ण उखडले आहेत.रस्त्याला जागोजागी खड्डे पडलेत त्या ठिकाणच्या रस्त्याची दुरुस्ती बांधकाम विभागाकडून अद्याप झाली नाही.
बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना प्रवाशी जनतेचे काहीही देणेघेणे नाही अशा पद्धतीच्या कामामुळे त्यांनी रस्त्याची दुरुस्तीला विलंब करीत आहेत.लाखो रुपये रस्ता दुरुस्तीला येऊनही रस्त्याला खड्डे पडलेत ही मोठी शोकांतिका आहे.रस्त्याला पडलेले खड्ड्याची दुरुस्ती करावी अशी मागणी पश्चिम भागातील जनतेची आहे.
