Crime robbery | राजगुरूनगरमध्ये मोठी घरफोडी; डॉक्टरांच्या घरातून दोन तोळ्यांचे दागिने लंपास
चोरीगेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत २,१०,००० इतकी आहे.
महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर येथील करंडेवस्ती, वाडा रोड येथे राहणाऱ्या डॉ. शरद गुलाबराव धानोरे (वय ५०) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी पहाटे घरफोडी करून सुमारे दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. चोरीगेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत २,१०,००० रुपये इतकी आहे.
डॉ. धानोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या पत्नी अनिता धानोरे यांच्यासोबत घरी झोपले होते. बुधवार रात्री ११ वाजता ते जेवण करून झोपले. गुरुवारी पहाटे ५ वाजता उठल्यावर त्यांच्या लक्षात आले की, घराच्या दरवाजाची कडी (कोयंडा) तुटलेली आहे. हॉलमधील सामान व कपडे विखुरलेले होते. दुसऱ्या बेडरूममधील लोखंडी कपाट व लॉकर खुले होते. तपासणी केली असता, लॉकरमधील सोन्याचे दागिने बेपत्ता आढळले.
गहाळ झालेल्या दागिन्यांमध्ये एक तोळा वजनाचे जोडवे (६०,००० रुपये), दोन तोळे वजनाची टिकका व चैन (१,२०,००० रुपये) व अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे कानातील कर्णफुले (३०,००० रुपये) यांचा समावेश आहे. चोरट्यांनी घराची व बेडरूमची कुलुपे तोडून प्रवेश केला. याबाबत डॉ. धानोरे यांनी याप्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.