Kisan Agriculture Exhibition | दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्या पुढाकाराने रेटवडी-वाफगाव गटातील हजारो शेतकऱ्यांना 'किसान कृषी प्रदर्शन २०२५' ची भेट
रेटवडी-वाफगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचा उत्साहाने प्रतिसाद
Kisan agricultural exhibition moshi
महावार्ता लाईव्ह | जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रेटवडी-वाफगाव जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांनी शेतकऱ्यांसाठी एक अनोखा उपक्रम राबवला. भारतातील सर्वात मोठे मानले जाणारे 'किसान कृषी प्रदर्शन २०२५' (KISAN Agri Show 2025) पाहण्यासाठी त्यांनी गटातील हजारो शेतकऱ्यांची मोफत सहल आयोजित केली. मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रात (PIECC) १० ते १४ डिसेंबर या कालावधीत भरलेल्या या भव्य प्रदर्शनाला रेटवडी-वाफगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी उत्साहाने प्रतिसाद दिला.
या प्रदर्शनात देश-विदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञान, ठिबक सिंचन यंत्रणा, ड्रोन फवारणी, जैविक खते, नवीन बियाणे वाण, शेततळे तंत्रज्ञान, सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे, शेतमाल प्रक्रिया यंत्रे आदींचे स्टॉल आणि लाइव्ह प्रात्यक्षिके होती. विविध कृषी कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष सवलतीच्या योजना जाहीर केल्या होत्या. इस्रायली आणि डच पद्धतीच्या शेती मॉडेल्स, पॉलीहाऊस, शेडनेट, हरितगृह तंत्रज्ञान यांचे अवलोकन करताना शेतकरी थक्क झाले. विशेषतः ड्रोनद्वारे फवारणीचे लाइव्ह डेमो पाहून अनेकांनी आपल्या शेतात ही सुविधा आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
सकाळी १० वाजता विविध गावांतून बसने निघालेल्या शेतकऱ्यांनी प्रदर्शनस्थळी पोहोचताच आधुनिक शेतीच्या जगाची अनुभूती घेतली. बस, नाश्ता, जेवण सर्व काही मोफत असल्याने शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. रेटवडी गावातील शेतकरी यांनी सांगितले, “आम्ही गावातून कधीच एवढ्या मोठ्या प्रदर्शनाला गेलो नव्हतो. दीप्ती ताईंनी सर्व व्यवस्था करून दिली. आता नवीन तंत्रज्ञान कळले आहे, पुढच्या हंगामात नक्की वापरणार.”
दीप्ती प्रसाद भोगाडे यांनी स्वतः सकाळपासून शेतकऱ्यांची विचारपूस केली आणि प्रत्येक स्टॉलवर तंत्रज्ञान समजावून सांगितले. त्या म्हणाल्या, “शेतकरी हा माझा कुटुंबाचा भाग आहे. गटातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी, प्रगतीची संधी मिळावी हाच उद्देश आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाल्यास असे उपक्रम सतत विस्ताराने राबवणार.”
याआधीच दीप्ती भोगाडे यांनी गटातील महिलांसाठी तुळजापूर-अक्कलकोट देवदर्शन यात्रा आयोजित केली होती. आता पुरुष व महिला दोन्ही वर्गासाठी शेतीविषयक उपक्रम राबवल्याने गटातील नागरिकांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. शेतकऱ्यांनी एकमताने दीप्ती भोगाडे यांचे आभार मानले आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भरघोस पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.
या सहलीमुळे रेटवडी-वाफगाव गटात आधुनिक शेतीबद्दल नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. लवकरच ठिबक सिंचन, ड्रोन फवारणी योजनांचा वापर वाढणार असल्याचे चित्र आहे. दीप्ती भोगाडे यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विरोधकांसमोर तगडे आव्हान उभे राहिले असून, निवडणुकीपूर्वीच त्यांचे पारडे जड झाल्याचे बोलले जात आहे.
