Ajit pawar plane crash | अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र शोकाकुल; खेड तालुका पत्रकार संघाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र शोकमय | खेड तालुक्यातील पत्रकारांनी केली श्रद्धांजली अर्पण

Ajit pawar plane crash | अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र शोकाकुल; खेड तालुका पत्रकार संघाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील पत्रकार बांधवांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनावर गहिवरून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.आज सकाळी सुमारे ८.४५ वाजता बारामतीजवळील विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात अजित पवार यांचे खासगी चार्टर्ड विमान  भीषण अपघातग्रस्त झाले.

 

या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील इतर चार जणांचा वैमानिक, क्रू मेंबर आणि सुरक्षा रक्षक जागीच मृत्यू झाला. विमान मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली, ज्यामुळे शव ओळखण्यासाठी अजित पवार यांची हातातील घड्याळाचा आधार घ्यावा लागला.

 

 

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. परखड, स्पष्टवक्ते आणि जनसामान्यांच्या हितासाठी झटणारे अजितदादा यांचे अपघाती निधन झाल्याने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते आणि इतर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला असून, राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

 

 

खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज सायंकाळी ६ वाजता खेड पंचायत समिती आवारातील पत्रकार संघ कार्यालयात अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संघाचे अध्यक्ष निलेश आंधळे, माजी अध्यक्ष महेंद्र शिंदे, बाळासाहेब सांडभोर, सुनिल थिगळे, किरण खुडे, राजेंद्र लोथे, रामचंद्र सोनवणे, नाजीम इनामदार, प्रभाकर जाधव, आशोक कोरडे यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.

 

अजितदादा यांच्या स्मृतीला वाहून पत्रकारांनी दोन मिनिटे मौन पाळले आणि त्यांच्या कुटुंबीयांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व महाराष्ट्राला या अपरिमित दुःखातून सामर्थ्य मिळावे, अशी प्रार्थना केली.