खेड तहसील कार्यालयातील अव्वल कारकूनाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
५० हजारांची तक्रारदाराकडे अव्वल कारकून रमेश ज्योतीराम वाल्मीक यांनी केली मागणी | २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले |
राजगुरूनगर : जमिनीच्या सातबाऱ्यावर उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी खेड तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन रमेश ज्योतीराम वाल्मीक यांना वीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.याप्रकरणी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, सन १९८८ चे कलम ७,७ अ. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
कुरुळी येथील तक्रारदार यांनी तुकडा बंदीची जमीन खरेदी केली होती.या जमिनीची सातबाऱ्यावर उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी व त्याप्रमाणे नोंदीचा आदेश मिळण्याकरिता तक्रारदाराने खेड तहसील कार्यालयात रीतसर अर्ज दाखल करून शासकीय चलन भरले होते. अव्वल कारकून रमेश ज्योतीराम वाल्मीक (वय ५१ वर्ष, पद अव्वल कारकुन, राजगुरुनगर-खेड तहसिल कार्यालय, ता. खेड, जि. पुणे. (वर्ग-३)) यांनी तक्रारदाराकडे ५० हजारांची लाचेची मागणी केल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली. याप्रकरणी पंचसमक्ष २० हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खेड तहसील कार्यालयात रमेश वाल्मीक यांना रंगेहात पकडले.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुर्ण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
