खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा मुद्दा लक्षवेधीने अधिवेशनात गाजला

आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी वेधले लक्ष; श्रेयवादामुळे आरोप-प्रत्यारोप

खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा मुद्दा लक्षवेधीने अधिवेशनात गाजला

राजगुरूनगर : श्रेयवादामुळे बहुप्रतिक्षित असलेल्या खेड पंचायत समिती  नवीन इमारतीचा मुद्दा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधीने चांगलाच गाजला.त्यामुळे आता इमारत नक्की कोणत्या जागेत साकारणार हा प्रश्न समोर आला आहे.

महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नुकतेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे पार पडले.या  अधिवेशनात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड पंचायत समितीची बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारत जागे विषयी लक्षवेधी लावली होती.आमदार मोहितेंनी अधिवेशनात इमारतीचा प्रश्न अतिशय सविस्तरपणे उपस्थित करून विधानसभा अध्यक्षांसह विधिमंडळ सदस्यांचे लक्ष वेधले. राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही इमारत हा विषय राजकारण असल्याचे सुरवातीलाच उत्तर देताना नम्रपणे नमूद केले.तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या उपस्थित प्रश्नावर भाष्य करीत इमारत जागे विषयी स्वतः आणि अधिकाऱ्यांचे पाहणीचा दाखला देत मोहितेंनी सुचविलेली इमारत जागा महत्वाची असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे खेड पंचायत समिती इमारत जागे विषयीचा मुद्दा अधिवेशनात चांगलाच गाजला आहे.

तत्कालीन आमदार स्व.सुरेश गोरे यांनी २०१९ मध्ये सध्याच्या पंचायत समिती समोरील रस्त्याच्या पलीकडे असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मोकळ्या जागेत इमारत बांधण्यासाठी पाच कोटींचा निधी आणला आणि इमारत कामाचे भूमिपूजन देखील केले होते.परंतु त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील आमदार झाले आणि गोरेंचा पराभव झाला.गोरेंच्या पराभवानंतर त्यांनी भूमिपूजन केलेली जागा अयोग्य असल्याचे कारणाने आमदार मोहितेंनी पंचायत समिती इमारतीच्या पाठीमागे मोडकळीस आलेल्या कर्मचारी निवासस्थान जागेत इमारत करण्याचा निर्णय करून त्यासाठी भरमसाठ निधीही खेचून आणीत जागेच्या पाहणीसाठी तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार देखील आले होते.

राज्यात सत्तातर होताच माजी खासदार व शिंदे गटाचे उपनेते शिवाजी आढळराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खेड पंचायत समिती इमारत विषयी सातत्याने पाठपुरावा करून इमारतीसाठी १३.९० कोटींचा निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता मिळविली आहे.पुन्हा नव्याने इमारत कामाचे भूमिपूजन लवकरच मुख्यमंत्र्यांचे हस्ते करणार असल्याचे आढळराव यांनी जाहीर केले.त्यानंतर लगेच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार मोहितेंनी इमारत जागेविषयी लक्षवेधी लावून याबाबत लक्ष वेधले आहे. 

अधिवेशनात मोहितेंनी इमारत जागा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी लवकरच मुख्यमंत्री यांचेसह विरोधी पक्षनेते अजित पवार व आमदार मोहिते पाटील एकत्रितपणे पाहणी करून चर्चेने हा विषय सोडविण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे आता पंचायत समितीची इमारत नक्की कोणत्या जागेत साकारणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित असल्याची चर्चा होऊ लागली आहे.