Khed | धक्कादायक..! आंगणवाडीतील लहान मुलांना दिला मुदत संपलेला पोषण आहार
खेड तालुक्यातील देशमुखवाडी गावात अंगणवाडी विद्यार्थ्यांना दिला मुदत संपलेला पोषण आहार | १० दिवसांपूर्वी बहुळ गावातील शाळेच्या धान्याला कीड लागल्याची घटना समोर आली होती.
राजगुरुनगर : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात देशमुखवाडी येथील अंगणवाडीतील मुलांना शालेय पोषण आहार सामुग्रीची कालबाह्य म्हणजेच मुदत संपलेला पोषण आहार वाटप केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.५) रोजी उघडकीस आली.
खेड पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतर्गत तालुक्यात जवळपास पाचशेच्या वर अंगणवाड्या असून अंगणवाडीतील चिमुकल्या मुलांना पोषण आहार दोन महिन्यांनी दिला जातो.देशमुखवाडी येथील अंगणवाडीतून सुतार समाजातील मुलाच्या पालकांना देण्यात आलेल्या पोषण आहार सामग्रीची मुदत (एक्सपायरी) दिनांक संपलेली असल्याची धककायायक घटना समोर आल्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाचा कारभार किती भोंगळ सुरु असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे.
अंगणवाडीतील दक्ष देविदास भालेराव या चिमुकल्या मुलांच्या पालकांना चनाडाळ,मुगडाळ, हळद पावडर व अन्य वस्तू या मुदत संपलेल्या दिल्या आहेत.खेड पंचायत समितीत सदर मुलाचे वडील यांनी देण्यात आलेला पोषण आहाराच्या पॅकिंग मधील वस्तू घेऊन आले होते.त्यांच्या समवेत देशमुखवाडी गावचे माजी सरपंच संदीप देशमुख होते.
कालबाह्या झालेला म्हणजेच मुदत संपललेला पोषण आहार शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयामार्फत सुरु असल्याचा प्रकार समोर आल्याने लहान चिमुकल्या मुलांच्या जीविताशी खेळण्याची घटना उघडकीस आली.यामुळे पालक वर्गात चिंता व्यक्त करीत आहेत.आहार द्यायचा तर चांगला द्या नाहीतर आमच्या बालकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असे कुणीही करू नये असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला.
कालबाह्य झालेला पोषण आहार दिला गेला असेल तर संबधित पोषण आहार देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
विशाल शिंदे - गट विकास अधिकारी खेड
मागील सहा महिन्यांपासून माझ्या मुलाला पोषण आहार दिला जात नव्हता. याबाबत मी संबंधित आंगणवाडी शिक्षिकेला विचारणा केली असता त्यांनी तुमचे आधार कार्ड नाही म्हणून तुम्हाला शासनाकडून पोषण आहार दिला जात नाही. आता मी आधार कार्ड दिले तर त्यांनी मुदत संपलेली सामग्री दिली.
देविदास भालेराव - पालक
