Sunita Butte Patil Visits Injured Students | कुरकुंडी अपघातानंतर लोकप्रतिनिधींची संवेदनशीलता; गतिरोधक बसवला, पीडित कुटुंबीयांचे सांत्वन
कुरकुंडी फाट्यावर तातडीने गतिरोधक बसवला; मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन, जखमी विद्यार्थिनींची घरी जाऊन विचारपूस
महावार्ता लाईव्ह | दोन दिवसांपूर्वी कुरकुंडी फाटा (एसटी स्टँड) येथे झालेल्या भीषण अपघाताची गंभीर दखल घेत, लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार या अपघातप्रवण ठिकाणी तातडीने गतिरोधक (स्पीडब्रेकर) बसविण्यात आला आहे. जिल्हा परिषद सदस्या सुनीता बुट्टे पाटील यांनी स्वतः घटनास्थळी उभे राहून हा गतिरोधक बसवून घेतला. तसेच त्यांनी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत, घरी परतलेल्या जखमी विद्यार्थिनींच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.
दोन दिवसांपूर्वी कुरकुंडी फाटा येथे हा दुर्दैवी अपघात घडला होता. ही घटना घडताच माजी आमदार दिलीप मोहितेपाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टेपाटील यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेऊन जखमी विद्यार्थिनींची भेट घेतली होती व त्यांच्या उपचारांबाबत चौकशी केली होती. त्यावेळी त्यांनी संभाव्य धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांच्याशी फोनवरून संपर्क साधून कुरकुंडी फाटा एसटी स्टँड येथे तातडीने स्पीडब्रेकर बसवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या सूचनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी या गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता बुट्टे पाटील यांनी पुढाकार घेतला. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी थांबून स्वतःच्या देखरेखीखाली या ठिकाणी स्पीडब्रेकर बसवून घेतला. यामुळे या मार्गावरील धोकादायक वाहतुकीला आळा बसणार असून ग्रामस्थांनी या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
या अपघातात कु. आदिती नवनाथ राळे या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. जिल्हा परिषद सदस्या सुनीता बुट्टे पाटील यांनी राळे कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली व या दुःखद प्रसंगातून सावरण्यासाठी कुटुंबीयांना धीर दिला.
जखमी विद्यार्थिनींची घरी जाऊन भेट व पालकांशी संवाद
रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतलेल्या जखमी विद्यार्थिनी कु. वैष्णवी संतोष जाधव, कु. वैष्णवी चंद्रकांत भोकसे, कु. अनुष्का नवनाथ राळे आणि कु. संजना निलेश भोकसे यांच्या घरी जाऊन सुनीता बुट्टे पाटील यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी त्यांनी जखमी विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांचे म्हणणे आणि त्यांनी मांडलेल्या सूचना गांभीर्याने ऐकून घेतल्या. भविष्यात विद्यार्थ्यांच्या प्रवासादरम्यान कोणताही धोका उद्भवू नये, यासाठी पालकांनी केलेल्या सूचना गांभीर्याने घेत तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः पुढाकार घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.या भेटीप्रसंगी कुरकुंडी गावचे सरपंच नितीन भोकसे, किवळे गावच्या सरपंच जया कड तसेच गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.