Khed - Aalandi Vidhansabha | पहिल्याच दिवशी मतदारसंघात ३ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
१९७ खेड - आळंदी विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवारी अर्ज खरेदी तर ३ अपक्ष अर्ज दाखल

राजगुरूनगर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची रणधुमाळी (दि.२२) पासून सुरुवात झाली.पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या १९७ खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघात सध्या फक्त १७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले.त्यांपैकी ३ उमेदवारांनी (दि.२२) रोजी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंड यांनी दिली.
आतापर्यंत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अमर मच्छिंद्र बोऱ्हडे (रा.वाफगाव,ता.खेड),अरविंद बाळासाहेब पानमंद (रा.दरकवाडी,ता.खेड),मयूर दिलीप होले (रा. राजगुरुनगर,पाबळरोड,ता.खेड) या तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
आजपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आज सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेतच निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज भरावा लागणार.२९ ऑक्टोबर ही अर्ज भऱण्याची शेवटची तारीख असेल. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये इतकी आहे. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे.
तसेच उमेदवाराला निवडणूक लढविण्यासाठी कराची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. थकबाकीदार असलेल्या उमेदवारांच्या अर्जावर कुणी आक्षेप घेतल्यास व त्यात तो थकबाकीदार असल्याचे आढळून आल्यास त्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरविला जाणार आहे.