Pune | आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं ; एकाचा जागीच मृत्यू दुसरा गंभीर जखमी

पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावाजवळ हा अपघात घडला. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याच्या कारने दुचाकीला धडक दिली.

Pune | आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं ; एकाचा जागीच मृत्यू दुसरा गंभीर जखमी

राजगुरुनगर : पुणे - नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. कार आणि दुचाकीची समोरासमोर धकड होऊन हा अपघात झाला. भीषण अपघातात कारमधील चालक हा खेडच्या आमदारांचा पुतण्या असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावाजवळ हा अपघात घडला. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याच्या कारने दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर मयुर मोहिते हा कारमध्येच बसून होता. तर या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या ओम भालेराव या १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.


फॉर्च्युनर कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली. दोन्ही गाड्यांची धडक इतकी भीषण होती की एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. कारने दोघांना चिरडल्यानंतर मयूर मोहिते हा कारमध्येच बसून होता. रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या एका कारच्या डॅशकॅममध्ये मयूर मोहिते कारमध्ये बसल्याचं रेकॉर्ड झालं आहे. स्थानिक नागरिक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मयूरला गाडीतून बाहेर काढलं.

 

 

अपघतानंतर ओम भालेरावच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीसात तक्रार दाखल केलीय. दुचाकीस्वार तरुणाच्या मृत्यूला कारणीभीत ठरल्या प्रकरणी मंचर पोलिसात आमदार पुतण्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर मंचर पोलीस स्टेशनला तणापूर्ण परिस्थिती होती.

 

"माझा पुतण्या नारायणगाव मार्गे कळंबवरुन खेडकडे येत होता. अपघात का झाला? कुठे झाला? त्यावेळी अंधार होता, त्यामुळे कसा झाला? याबाबत कुणालाच काहीच कल्पना नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलीस सगळ्या प्रकारची चौकशी करत आहेत. झालेली गोष्ट 100 टक्के चुकीची आहे. मी मृत तरुणाच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. मी वातावरण शांत झालं की, स्वतः कुटुंबाची भेट घेणार आहे. मी कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही, करणार नाही." - आमदार दिलीप मोहिते पाटील