Khed | आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम
खेड तालुक्यातील देवतोरेणे गावच्या आवारी कुटुंबीयांकडून वृक्षारोपण
महावार्ता लाईव्ह | श्रीक्षेत्र काळभैरवनाथ देवतोरणे (ता.खेड ) येथील प्रसिद्ध प्रगतशील शेतकरी कुटुंबातील आदर्श माता स्वर्गीय छबाबाई शंकर आवारी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी दशक्रिया विधीच्या दिवशी देवतोरणे वैकुंठभूमी येथे सात झाडे लावून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली.
पराळे विकास सोसायटीचे संचालक व देवतोरणे ग्रामपंचायतीचे माजी संचालक आनंदा आवारी, प्रसिद्ध निवेदक आप्पा आवारी व प्रगतशील शेतकरी तुकाराम व भिकाजी यांच्या पुढाकाराने हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. दशक्रिया विधीसाठी खेड तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वर्गीय छबाबाई यांना चार मुले आणि चार मुली असून, सात भावंडांनी एकत्र येऊन आईच्या स्मरणार्थ सात झाडे लावण्याचा निर्णय घेतला. लावलेल्या झाडांचे संवर्धन व्हावे यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
या उपक्रमामुळे केवळ श्रद्धांजली अर्पण केली गेली नाही, तर पर्यावरण संरक्षणाचा महत्वपूर्ण संदेशही देण्यात आला. गावातील अनेक नागरिकांनी या कार्याचे कौतुक केले असून, इतर कुटुंबांनीही अशा उपक्रमांचा स्वीकार करावा, असे मत भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी व्यक्त केले.
