Sarpanch Election | संघर्षावर मात करत..कडधे गावच्या सरपंचपदी रोहिणी संदीप मिरजे बिनविरोध
खेड तहसीलदार ,पुणे जिल्हाधिकारी आणि मुंबई उच्च न्यायालय या सर्व ठिकाणी १४ महिने मोठा संघर्ष झाल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध
Pune | Kadadhe sarpanch Rohini sandip mirje
महावार्ता लाईव्ह | खेड तहसीलदार ,पुणे जिल्हाधिकारी आणि मुंबई उच्च न्यायालय या सर्व ठिकाणी १४ महिने मोठा संघर्ष झाल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात खेड तालुक्यातील कडधे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ.रोहिणी संदीप मिरजे यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवड होताच कडधे ग्रामस्थांनी गुलाल भंडाराची मुक्तपणे उधळण आणि फटाक्यांची अतिशबाजी करीत गावात जल्लोष केला.
यापूर्वीच्या कडधे गावच्या सरपंच प्रियंका अभिजित देवदरे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीचे ९ पैकी सात सदस्य विरोधात गेल्याने ८ जानेवारी २०२४ रोजी अविश्वास ठराव मंजूर झाला. अविश्वास विरोधात देवदरेंनी तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचेकडे अपील केले. २०२४ लोकसभा निवडणूकीच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रशांत बेडसे यांचाच निर्णय ग्राह्य धरत निर्णय दिला.
त्यानंतर तहसीलदार बेडसे यांना काही कारणांनी सेवेतून बडतर्फ करण्यात आले.नवीन आलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी कडधे ग्रामपंचायत निवडणूकित आरक्षण मधून निवडून आलेले तीन सदस्य अपात्र असल्याचे चुकीचे पत्र देवदरे यांना दिले. त्या चुकीच्या पत्राच्या आधारे पुन्हा सरपंचपदी प्रियंका देवदरे विराजमान झाल्या.परंतु सामाजिक कार्यकर्ते संदीप मिरजे यांनी तीन सदस्यांचे माहिती अधिकारात तहसील कार्यालयात माहिती मागविली असता तिन्ही सदस्यांचे नामनिर्देशनपत्र व त्यासोबत जात तपासणी प्रमाणपत्र व पावत्या अशी सर्व कागदपत्र माहिती अधिकारात मिळविले आणि उच्च न्यायालयात दावा दाखल केला. दावा दाखल होताच कोर्टाने तहसीलदार देवरे यांना नोटीस काढून सरपंच देवदरे यांना दिलेल्या पत्राचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश काढले.
तहसीलदार देवरे यांनी चुकीचे पत्र दिल्याबद्दल कोर्टात माफीनामा सादर करीत तीन सदस्य अपात्र नसल्याचे दुसरे पत्र कोर्टात दिले. तहसीलदार यांचा माफीनामा व तीन सदस्यांचे पत्र मिळताच कोर्टाने सरपंचपदाची निवडणूक घेण्याचा आदेश केला. त्यामुळे प्रियंका देवदरे यांची खेड महसूल,पुणे जिल्हाधिकारी व उच्च न्यायालयात हार झाल्याने त्यांना सरपंच पदावरून पाय उतार व्हावे लागले.प्रियंका देवदरे यांनी अविश्वास ठरवावर मात करण्यासाठी केलेले प्रयत्न फोल ठरले आणि रोहिणी मिरजे यांनी सर्व पातळ्यांवर मात करीत यश मिळवीत सरपंचपद मिळविले.
कडधे ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात निवडणूक अधिकारी शितल शेवाळे यांचे अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२०) रोजी घेण्यात आली. निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज ग्रामपंचायत अधिकारी दिनकर ओव्हाळ यांनी पाहिले.
सरपंचपदासाठी रोहिणी मिरजे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. निवडणूक प्रसंगी सभागृहात नवनिर्वाचित सरपंच रोहिणी मिरजे, उपसरपंच सचिन नाईकडे, विकास मंडलिक, अर्जुन जाधव, जयमाला कदम, प्रगती नाईकडे हे सहा सदस्य उपस्थित होते. तर मावळत्या सरपंच प्रियंका देवदरे, केतन चव्हाण, कमल नाईकडे हे तीन सदस्य गैरहजर राहिले.निवडणूक प्रसंगी खेड स्टेशनचे प्रभारी अधिकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. सरपंचपदाची निवडणूक अतिशय शांततेत पार पडली.
यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती. निवडणूक बिनविरोध होताच संपूर्व गावातील लोक एकत्र येत गुलाल भंडाराची मुक्तपणे उधळण करीत ग्रामस्थांनी जल्लोष केला. सर्व ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच यांची पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढताना प्रचंड जल्लोष केला.
सरपंचपदाची निवडणूक घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असताना लोकप्रतिनिधी यांच्या दबावाला बळी पडून जिल्ह्याच्या उच्च पदावर असलेले जिल्हाधिकारी यांनी सरपंचपदाची निवडणूक २० मार्च ऐवजी २७ मार्चला घेण्याचा आदेश काढला. निवडणूक रद्दचे काढलेला आदेश काढून तालाठ्यामार्फत सदस्यांना पाठविण्याचा खेळ केला. परंतु हा खेळ आपल्या अंगलट येणार हे समजताच काढलेला एजेंटा मागे घेण्यात घेण्याचा खटाटोप जिल्हाधिकाऱ्यांना तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार, सर्कल व तलाठी यांना आला. सरपंचपदाची निवडणूक घेण्याचे कोर्टाचे आदेश असताना जिल्हाधिकारी यांनी कोणत्या अधिकारात निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला हा मोठा संशोधनाचा विषय चर्चेचा बनला आहे. निवडणूक पुढेच्या तारखेला घेण्याचे काढलेला एजेंटा लगेच प्रशासकीय पातळीवर गायब करण्यात आला. पण कडधे ग्रामपंचायत निवडणूक विषयी अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका खेड तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय होण्याची शक्यता आहे.
भाविकभक्तांच्या नवसाला पावणारे श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान आमच्या कडधे गावात आहे.माघ आणि चैत्र महिन्यात मोठी यात्रा भरत असून दर्शनासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकभक्त येतात अशी धार्मिक परंपरा गावाला आहे. सरपंचपदाच्या मोहामुळे काहींनी वेळेत राजीनामा दिला नाही.त्यामुळे काही सदस्य नाराज होऊन वेगळी भूमिका घेतली.सरपंचपद वाचविण्यासाठी केलेला खटाटोप अयशस्वी झाला आणि आम्ही केलेले प्रयत्न यशस्वी ठरले.कडधे गाव विकास प्रक्रियेने पुढे नेण्यासाठी सरपंचपदाच्या काळात प्रयत्न करणार आहे.गावातील विकास कामांना प्रधान्यक्रम देऊन कामे करणार आहे.गावच्या विकासकामांना निधी मिळविण्यासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांची मदत घेणार आहे. विकासकामे करताना भ्रष्टाचाराला थारा अजिबात दिला जाणार नाही.आमचे ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील लोकांना विश्वासात घेऊन स्वच्छ कारभार करणार आहे.
रोहिणी मिरजे - सरपंच कडधे ग्रामपंचायत
