Forest department khed | चास परिसरातील अनधिकृत वृक्षतोडीवर वनविभागाचा मोठा घाव; दोन ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक मशीन जप्त
वन कर्मचाऱ्यांना दमदाटी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव घेऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न; नंबर प्लेट नसलेले व कालबाह्य ट्रॅक्टरही कारवाईच्या कचाट्यात
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील राजगुरुनगर वनपरिक्षेत्र विभागाने अनधिकृत वृक्षतोडीविरोधात मोठी कारवाई करत दोन इसमांना रंगेहात पकडले असून त्यांच्या ताब्यातील दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, झाडे तोडण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक मशीन आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे चास, बुट्टेवाडी व परिसरात वृक्षतोड करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
महेश बाळासाहेब अभंग (रा. कडूस) आणि योगेश हरिदास तळेकर (रा. बुट्टेवाडी) यांना चास परिसरात शेतातील झाडे तोडताना वन विभागाच्या पथकाने पकडले. संबंधितांकडे झाडे तोडण्यासाठी वन विभागाची कोणतीही वैध परवानगी नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
राजगुरुनगर वनपरिक्षेत्र अधिकारी यादव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चास विभागाचे वनपाल संतोष बिरादार आणि वनरक्षक सागर तांबे यांनी ही कारवाई केली. प्राथमिक तपासात चास परिसरात आंबा, जांभूळ, चिंच आणि लिंब यांसारख्या विविध प्रकारच्या झाडांची तोड करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
वनविभागाची भूमिका
राजगुरुनगर वनपरिक्षेत्र विभागाचे अधिकारी यादव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चास विभागाचे वनपाल संतोष बिरादार व वनरक्षक सागर तांबे यांनी ही कारवाई केली. दुपारी २ वाजता पकडलेले ट्रॅक्टर रात्री ८ वाजता शिरोली येथील वन विभागाच्या कार्यालयात आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले.कारण अरेरावी करून ट्रॅक्टर व ट्रॉली आणीत नव्हते परंतु वन विभाग अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने लाकुड भरलेले दोन्ही ट्रॅक्टर पकडले आहेत.
कायदेशीर बाजू
भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील कलम ५५ नुसार, राखीव वनक्षेत्रात अनधिकृत वृक्षतोड केल्यास ६ महिन्यांपर्यंत कारावास किंवा २,००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच, या प्रकरणी दोन्ही ट्रॅक्टर व ट्रॉली यांना नंबर प्लेट नसल्याने, आरटीओला याबाबतचा अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी जाधव यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांना धमकी
महेश अभंग व योगेश तळेकर यांना वनपाल बिरादार व वनरक्षक तांबे यांनी पकडल्यानंतर, दोघांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अरेरावी व दमदाटी केली. तसेच, "जुन्नर विभागाचे डीएफओ यांना उभे करतो, मग तुम्हाला कळेल मी कोण आहे" अशी धमकी दिली. वनविभागाकडून कारवाई होऊ नये म्हणून त्यांनी अनेकांना फोन लावून कारवाई थंड करण्याची मागणी केली होती.
इतर वृक्षतोड टोळ्या
खेड व चाकण वनपरिक्षेत्र विभागात विजय वाळुंज, लद्दन सलून पाबळरोड, आतिक राक्षेवाडी, अजिज शेख कडूस, अन्सारी वाकी बुद्रुक व खेड, इकरार राक्षेवाडी, केदारी व पारधी रानमळा, लंबू नवसाद बहुळ, शहाहाजीद राजपूत पाबळरोड, जाकीर, समीर, सलीम, काल्या, झाकिर अशा अनेक टोळ्या बिनधास्तपणे वृक्षतोड करीत आहेत. मात्र, या सर्वांवर वनविभागाने कारवाई केली नसल्याची तक्रार आहे.
वनविभागातील कथित गैरप्रकार
राजगुरुनगर वनपरिक्षेत्र कार्यालयातील 'मुके' या कर्मचाऱ्याविषयी खेड तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुके हा वन विभागातील कर्मचारी 'मोठा सेटलमेंट बादशहा' असल्याचे सांगितले जाते. कोणावर कारवाई करायची किंवा कोणाला सोडून द्यायचे हे ते ठरवतात, त्यांच्यापुढे वन विभागाचे अधिकारी देखील नमते घेत आहेत, असा आरोप आहे. वनपाल व वनरक्षकांना याची पूर्ण माहिती असूनही ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवत नाहीत, हे मोठे दुर्दैव असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पुढील कारवाई
वन विभागाच्या नियमानुसार दोन्ही इसमांविरुद्ध कठोर कारवाई होणार असून, पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. दोन्ही ट्रॅक्टर बाबतचा अहवाल आरटीओला सादर करण्यात येणार आहे. या प्रकरणी अभंग आणि तळेकर यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक असून, ट्रॅक्टर व ट्रॉली आरटीओ विभागाने रद्द करण्याची आवश्यकता आहे, असे मत वनपरिक्षेत्राधिकारी यादव जाधव यांनी व्यक्त केले.