Chain snatching | दुकानात एकटी असताना ५१ वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; ग्राहक बनून आलेल्या दोघांचा धाडसी गुन्हा
नट-बोल्ट देण्यासाठी वाकल्या असताना, आरोपीने क्षणार्धात त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी जोरात ओढून हिसकावले
महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर चव्हाणमळा परिसरात भर सायंकाळी घडलेल्या धाडसी प्रकारात दोन अज्ञात इसमांनी दुकानात एकटी असलेल्या ५१ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी ७.४५ ते ८.०० वाजण्याच्या सुमारास शिवमृदा बिल्डिंग, पाबळ रोड येथील ‘पोतेकर इलेक्ट्रिक’ दुकानात घडली.
याबाबत सुर्वणा सिद्धेश्वर पोतेकर (वय ५१) यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन इसम मोटारसायकलवरून दुकानासमोर आले. त्यापैकी मागे बसलेला इसम दुकानात येऊन काउंटरजवळ उभा राहिला आणि ‘एक्सा ब्लेड पान’ (ब्लेड पान) मागू लागला. पोलेकर यांनी त्यांच्याकडे लहान ब्लेड पान उपलब्ध असल्याचे सांगितले असता, त्या इसमाने लगेच नट-बोल्टची मागणी केली.
नट-बोल्ट देण्यासाठी पोतेकर खाली वाकल्या असताना, आरोपीने क्षणार्धात त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जोरात ओढून हिसकावले. त्यानंतर तो तात्काळ दुकानाबाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलवर बसला आणि दोघेही आरोपी राजगुरूनगरच्या दिशेने पळून गेले. हिसकावलेले मंगळसूत्र अंदाजे तीन तोळ्यांचे असून त्याची किंमत अंदाजे ₹१,१८,०००/- असल्याचे फिर्यादीने सांगितले.
पोलिसांची तपासमोहीम सुरू या घटनेप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. दरम्यान, भरवस्तीत अशा प्रकारे झालेल्या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
