Khed | राजगुरुनगरमध्ये करवाढीविरोधात शोले स्टाईल आंदोलन
सामाजिक कार्यकर्ते दिपक थिगळे आणि स्वप्नील माठे राजगुरूनगर शहरातील वाडारोड पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन | नागरिकांचा मोठा पाठिंबा

Rajgurungar aandolan
महावार्ता लाईव्ह | राजगुरुनगर नगरपरिषदेने लागू केलेल्या अन्यायकारक करवाढीविरोधात सामाजिक कार्यकर्ते दिपक थिगळे आणि स्वप्नील माठे यांनी मंगळवार (दि.१) अनोखे आंदोलन छेडले. दोघांनीही राजगुरुनगर शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून चित्रपट 'शोले'च्या स्टाईलने निदर्शन केले. या आंदोलनाची बातमी कळताच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली आणि आंदोलनाला जोरदार पाठिंबा दर्शवला.
करवाढीविरोधातील संघर्षाची पार्श्वभूमी
राजगुरूनगर नगरपरिषद करवाढ रद्द करण्यात यावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चाकण येथे निवेदन देण्यात आले होते. यापूर्वी दिपक थिगळे यांनी या करवाढीविरोधात मागील काही दिवसांपूर्वी चार दिवसांचे उपोषण केले होते. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांनी सकारात्मक उत्तर देत कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी दिपक थिगळे यांना भेटून उपोषण मागे घेण्यासाठी समजूत काढून उपोषण सोडले होते. मात्र, त्यानंतरही नगरपरिषदेने केलेली करवाढ रद्द करण्यात आली नाही, त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला.
शोले स्टाईल आंदोलन
आज सकाळी दिपक थिगळे आणि स्वप्नील माठे यांनी राजगुरुनगर शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. 'शोले' चित्रपटातील प्रसिद्ध दृश्याची आठवण करून देणाऱ्या या आंदोलनात दोघांनीही टाकीवरून करवाढ रद्द करण्याची मागणी केली. "नगरपरिषदेने सामान्य नागरिकांवर अन्यायकारक कर लादले आहेत. आमचे आश्वासन पाळले गेले नाही, म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावे लागले," असे दिपक थिगळे यांनी सांगितले.
नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा
आंदोलनाची माहिती समजताच राजगुरुनगरमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने पाण्याच्या टाकीजवळ जमून आंदोलकांना पाठिंबा दर्शवला. "ही करवाढ आमच्या जिवावर उठली आहे. दिपक थिगळे आणि स्वप्नील माठे आमच्यासाठी लढत आहेत, आम्ही त्यांच्या सोबत आहोत," अशी भावना राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक गणेश थिगळे यांनी व्यक्त केली. काही नागरिकांनी तर "करवाढ रद्द करा" "दिपक थिगळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा देत निदर्शनेही केली.
थेट पोलीस ठाण्यात..
आंदोलनाची बातमी कळताच खेड पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलनकर्ते दीपक थिगळे व स्वप्नील माठे यांना ताब्यात घेऊन खेड पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.
प्रशासनाची भूमिका काय ?
या आंदोलनामुळे राजगुरुनगर नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनावर दबाव वाढला आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा करून आश्वासन देण्यात आले. यापूर्वी विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवाल नागरिक आणि आंदोलकांकडून उपस्थित करण्यात आला. दरम्यान, आंदोलनाची तीव्रता पाहता प्रशासनाकडून लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
पुढे काय ?
"आम्हाला शांततेत न्याय हवा आहे. जर प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू," असे दिपक थिगळे यांनी ठणकावले. दरम्यान, नागरिकांनीही या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले आहे.
या अनोख्या आंदोलनाने राजगुरुनगर शहरात खळबळ उडाली असून, आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील पावलांकडे लागले आहे. करवाढीचा हा वाद लवकरच संपणार की आणखी चिघळणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.