Khed | परसुल गावच्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर तातडीने उपाययोजना ; गाव तळ्याच्या खोलीकरणासाठी १०.५० लाख मंजूर
परसूल गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई ; तळ्याच्या खोलीकारणासाठी शरद बुट्टे पाटील यांनी दिला निधी

Sharad buttepatil Felicitated on behalf of parasul Village
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील परसुल गावात मागील पंधरावड्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले होते. याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी तातडीने पावले उचलली. गावातील महिलांच्या मागणीनुसार गाव तळ्याचे खोलीकरण आणि बांधकामासाठी १०.५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातील एका रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती, मात्र पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत हे काम रद्द करून हा निधी तळ्याच्या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला.
आज परसुल येथे झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत शरद बुट्टे पाटील यांनी मंजुरीचे पत्र ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केले. यावेळी उपसरपंच सारिका शिंदे, ग्रामसेवक सुरेश घनवट, माजी सरपंच चंद्रकांत सुतार, उद्योजक नामदेवराव गट्टे, किसन शिंदे, आत्माराम शिंदे, विष्णु शिंदे, नामदेव शिंदे, तानाजी सातकर, नामदेव घोंगे, मंदाबाई घोंगे, आनंदा आवारी, शंकर चौरे, ज्ञानदेव शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तातडीने काही दिवसांत हे काम मार्गी लागल्याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आणि शरद बुट्टे पाटील यांचे आभार मानले.
जलजीवन मिशनला गती, मे महिन्यात खोलीकरणाचे काम
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत गाव तळ्याच्या खोलीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले की, मे महिन्यातच तळ्याचे खोलीकरण करणे आवश्यक आहे, त्यामुळे हे काम तातडीने मंजूर करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तळ्याची खोली १५ फूट वाढवली जाणार असून, बाहेरील पाणी थेट तळ्यात जाऊ नये यासाठी आवश्यक बांधकाम केले जाईल. यामुळे गावाला पिण्याच्या पाण्याची सुविधा दीर्घकाळ टिकून राहील.
खेड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी स्वतंत्र धोरणाची मागणी
शरद बुट्टे पाटील यांनी खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांच्या उद्भव बळकटीकरणाची गरज असल्याचे नमूद केले. यासाठी जिल्हा परिषदेने स्वतंत्र धोरण आखावे आणि गावांच्या गरजा लक्षात घेऊन काही ठिकाणी नियम शिथिल करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बुट्टे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. यामुळे तालुक्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्यास मदत होईल. परसुल गावातील या तातडीच्या उपाययोजनेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.