Pune police | अवैध धंद्याची तक्रार नागरिकांना आता घरबसल्या नोंदवता येणार ; पुणे ग्रामीण पोलिसांचा उपक्रम
अवैध धंद्याची तक्रार नागरिकांना आता घरबसल्या नोंदवता येणार असून तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे

महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्ह्याचा परिसर मोठा आहे. तक्रारदार नागरिकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणे तितकेसे सहज सोपे नाही. यामुळेच अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच नागरिकांना थेट जागेवरून तक्रार करण्यात यावी, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी "व्हॉट्सॲप दक्ष प्रणाली" हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. यामुळे नागरिकांना आता घरबसल्या तक्रार नोंदवता येणार असून तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील अवैध व्यावसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी तक्रारी कराव्यात, त्यावर कारवाई केली जाईल, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
जुगार अड्डे, मटका, अवैध दारू विक्री आणि ड्रग्सचा व्यापार यांसारख्या बेकायदा गोष्टींनी शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मुळे रुजवली आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेकदा नागरिकांना अवैध धंद्यांबाबत तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्याला जाणे शक्य होत नाही किंवा भीती वाटते. पोलीस ठाणे व गावांचे अंतर खूप आहे. त्यामुळेच ही समस्या लक्षात घेत पुणे ग्रामीण पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे. व्हाट्सअप नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांना घरबसल्या, मोबाइलच्या माध्यमातून तक्रार नोंदवता येईल. यामुळे वेळेची बचत होईल आणि तक्रार करण्याची प्रक्रिया देखील सुलभ होईल.
तक्रारीत आपल्या भागातील अवैध व्यवसायाचे ठिकाण, तिथे चालणाऱ्या धंद्याचे स्वरूप, संबंधित व्यक्तीचे नाव, फोटो आणि लोकेशन यांसारखी माहिती देता येणार आहे. तक्रारीसोबत संबंधित पोलीस स्टेशन आणि उपविभागाचे नाव नोंदवणे आवश्यक आहे. या प्रणालीद्वारे तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. तक्रारदाराचा मोबाइल क्रमांक किंवा नाव उघड होणार नाही, ज्यामुळे नागरिक निर्धास्तपणे तक्रार करू शकतील.
…'व्हाट्सअपॲप दक्ष प्रणाली' म्हणजे काय ?
डिजिटल युगात मोबाइल प्रत्येकाच्या हातात आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीसांनी "व्हॉट्सॲप दक्ष प्रणाली" सुरू केली असून या प्रणाली अंतर्गत नागरिकांना ९९२२८९२१०० या व्हॉट्सॲप क्रमांकावर थेट तक्रार नोंदवता येणार आहे. नागरिकांना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार न करता बसल्या ठिकाणावरून ती करता येणार आहे.