Khed | राजगुरूनगरात नजरेत राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र टॅगलाईनसह दहीहंडी उत्सव संपन्न ; अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात
उत्सवादरम्यान पाईट येथील कुंडेश्वर अपघातातील १२ मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महावार्ता लाईव्ह | "नजरेत राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र" या टॅगलाईनसह मी सोशल फाउंडेशन आणि सुधीर मुंगसे मित्र परिवार यांनी राजगुरूनगर शहरात दहीहंडी उत्सवाचे यशस्वी आयोजन केले. यावेळी गोविंदा पाथकांनी व प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. या उत्सवादरम्यान पाईट येथील कुंडेश्वर अपघातातील १२ मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या दु:खद घटनेमुळे कार्यक्रम रद्द करण्याचा विचार झाला होता, परंतु दहीहंडी हा धार्मिक आणि वर्षानुवर्षे चालत आलेला पारंपरिक उत्सव असल्याने तो आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी भावना राष्ट्रवादी पक्षाचे नेते सुधीर मुंगसे यांनी व्यक्त केली.
अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात
मी सोशल फाउंडेशन आणि सुधीर मुंगसे मित्र परिवार यांनी अपघातग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ठोस पावले उचलली आहेत. या उपक्रमांतर्गत खालील मदत जाहीर दहीहंडी उत्सवात करण्यात आली.
▪️मोफत शिक्षण : अपघातग्रस्त कुटुंबातील मुलांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत केले जाईल.
▪️आरोग्य सेवा : भविष्यात या कुटुंबांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवल्या जातील.
▪️रोजगाराची संधी अपघातग्रस्त कुटुंबीयांतील मुलांना नोकरीची गरज असेल, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.
उत्सवाचा धार्मिक आणि सांस्कृतिक महिमा
दहीहंडी उत्सव हा केवळ आनंदाचा उत्सव नसून, तो सामाजिक एकता आणि परंपरांचे प्रतीक आहे. या उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या पथकांनी उत्साहपूर्ण वातावरणात हंडी फोडली. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद लुटला.
दहीहंडी हा उत्सव आम्हाला एकत्र आणतो आणि समाजातील दु:खद घटनांमध्येही एकमेकांना आधार देण्याची प्रेरणा देतो. कुंडेश्वर अपघातातील बाधित कुटुंबांना आम्ही शक्य ती सर्व मदत करू आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी कटिबद्ध आहोत." - सुधीर मुंगसे अध्यक्ष मी सेवेकरी सोशल फाउंडेशन
