Crime News | चाकण येथे घरगुती वादातून पुतण्याकडून चुलत्याचा निर्घृण खून

चुलता आडवायला आला, पुतण्याने रॉड छातीत भोकसला

Crime News | चाकण येथे घरगुती वादातून पुतण्याकडून चुलत्याचा निर्घृण खून

 

महावार्ता लाईव्ह |  चाकण शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ (ता. खेड) गावच्या हद्दीतील पानसरेवस्ती येथे शुक्रवारी (दि. ६ जून २०२५) सकाळी साडेआठच्या सुमारास घरगुती वादातून एक धक्कादायक खुनाची घटना घडली. या घटनेत पुतण्याने आपल्या चुलत्याचा लोखंडी रॉडने छातीत भोसकून निर्घृण खून केला. दत्तात्रय बाबुराव पानसरे (वय ६२, रा. पानसरेवस्ती, बहुळ) असे मृत इसमाचे नाव आहे, तर या प्रकरणी आरोपी दशरथ गुलाब पानसरे (रा. बहुळ) याला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुळ येथील पानसरेवस्तीमध्ये घरगुती कारणावरून दशरथ गुलाब पानसरे आणि त्याचा सख्खा चुलत भाऊ तुकाराम दत्तात्रय पानसरे यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दशरथने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तुकारामवर लोखंडी रॉडने हल्ला केला. तुकारामने स्वसंरक्षणार्थ हा हल्ला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

 

या गोंधळादरम्यान, तुकारामचे वडील दत्तात्रय पानसरे यांनी मध्यस्थी करण्यासाठी पुढे येत दशरथला "तुकारामला का मारतोस?" अशी विचारणा केली. याचा राग आल्याने दशरथने थेट दत्तात्रय यांच्या छातीत लोखंडी रॉड भोसकला. या हल्ल्यात दत्तात्रय गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.