नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

खेड तालुक्यातील रेटवडी गावातील घटना ; पंधरा दिवसात बिबट्याचा दुसरा हल्ला

नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

राजगुरूनगर :  नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याने प्राणघातक हत्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या रेटवडी गावात ही घटना घडली आहे.

यामध्ये सार्थक नवनाथ वाबळे हा मुलगा जखमी झाला आहे. गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी घटना असून रेटवडीकर भयभयीत झाले आहेत. रेटवडी येथील वाबळेवस्ती येथे सार्थक आणि त्याचे वडील नवनाथ वाबळे हे बापलेक संध्याकाळी सव्वासात वाजता गुरांच्या गोठयाकडून घरी जात होते. सार्थकने घरी पाळलेले लहान कुत्र्यांचे पिल्लू उचलून घेतले होते.

झाडाझुडांपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने लहान कुत्र्यावर आणि सार्थकवर झेप घेऊन हल्ला केला. या हल्ल्यात सार्थक हाताच्या दंडाला आणि पोटाला मोठ्या जखमा झाल्या आहेत. सार्थक आणि त्याच्या वडिलांनी आराडाओरडा केल्यामुळे बिबट्याने सार्थकने कडेवर उचलून घेतलेले कुत्र्याच्या पिलू तोंडात पकडून बिबट्याने धुम ठोकली.घटनास्थळी तात्काळ वनविभागाचे कर्मचारी सुषमा चौधरी, दत्तात्रय फाफाळे यांनी धाव घेऊन जखमी अवस्थेत सार्थकला पुढील उपचारासाठी दवखण्यात हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

पंधरा दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने साडेतीन वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला होता. या परिसरात बिबट्याचा वावर आहे. दोन दिवसांपूर्वी शेतात गवत कापताना बिबट्याने पाठीमागुन येऊन एका शेतकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र शेतकऱ्याने जोरात पळ काढल्यामुळे ते बचावले. त्यामुळे शेतकरी आणि महिला दिवसा शेतकाम करण्यास जीव मुठीत धरून जात असल्याचे चित्र दिसत आहे. 

तसेच वाबळेवस्तीलगत हाकेच्या अंतरावर सतारकावस्ती येथे जिल्हा परिषेदेची प्राथमिक शाळा आहे. सध्या शाळा सकाळाच्या सत्रात सुरू असून लहान मुले शाळेत येत असतात. बिबटयाच्या भीतीने शाळेत मुलांना पाठविण्यास पालकांना चिंता वाटत आहे. वनविभागाने या परिसरात दोन पिंजरे लावले आहे. मात्र, बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. वाबळेवस्ती येथे सुद्धा पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थ शेतकऱ्यांनी केली आहे.

-------------------------------★★★-----------------------------------