Khed | विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण; रविवारी राजगुरुनगर येथे होणार आयोजन
केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी साहित्य संमेलनासाठी दिल्या शुभेच्छा
महावार्ता लाईव्ह | कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित तिसरे विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन हे पद्मश्री पुरस्कारप्राप्त विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जयंतीदिनी रविवार, (दि.१५) रोजी नीलकमल लॉन्स, पुणे-नाशिक रोड, राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथे संपन्न होणार आहे. संमेलनाचे निमंत्रक अशोक टाव्हरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
नामदेव ढसाळ हे मराठी दलित साहित्याचे अग्रणी कवी, विचारवंत आणि दलित पँथर चळवळीचे सहसंस्थापक होते. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे जिल्ह्यातील पूर (ता. खेड) येथे झाला होता. कनेरसर गावात त्यांचे शालेय शिक्षण झाले. नंतर मुंबई ही त्यांची कर्मभूमी बनली, जिथे त्यांनी दलित समाजाच्या शोषणाविरुद्ध विद्रोही आवाज उठवला आणि 'गोलपीठा' सारख्या क्रांतिकारी काव्यसंग्रहाद्वारे मराठी साहित्यात नवी दिशा दिली.
या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थित राहणार आहेत. तर संमेलनाध्यक्ष पद भूषविणारे आहेत कनेरसर गावचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य कांताराम सोनवणे. परिसंवादप्रमुख म्हणून ज्येष्ठ गझलकार व साहित्यिक म. भा. चव्हाण असतील, तर कविसंमेलनाचे अध्यक्ष मुंबईचे ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अनंत धनसरे राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ व साहित्यिक प्रकाश शितोळे कार्यरत आहेत.
केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या साहित्य संमेलनासाठी शुभसंदेश दिला असल्याची माहिती अशोकराव टाव्हरे यांनी दिली.
संमेलनात ग्रंथदिंडी, परिसंवाद, काव्यसंमेलन आणि गुणवंत साहित्यिक/साहित्यप्रेमींचा सन्मान असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून साहित्यिक, कवी, विचारवंत आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होणार आहेत.
नामदेव ढसाळ यांनी 'गोलपीठा', 'हाडकी हाडवळा', 'मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे', 'गांडु बगीचा', 'तुही इयत्ता कंची?', 'मुर्ख म्हातार्याने डोंगर हलविले?', 'सत्तेत जीव रमत नाही', 'प्रियदर्शनी', 'खेळ' आदी विपुल साहित्यरचना केल्या. त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार आणि राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले होते. ते विश्वसाहित्यिक म्हणून ओळखले जातात.
खेड तालुक्यातील मान्यवर, साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी ढसाळांचा वारसा जपण्यासाठी, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अशोक टाव्हरे यांनी केले आहे. हे संमेलन नामदेव ढसाळांच्या विचारांना आणि दलित-विद्रोही साहित्य परंपरेला नवे बळ देणारे ठरणार आहे.
