खेड तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणूकीसाठी रविवारी होणार मतदान
मतमोजणी सोमवारी (दि.१९) राजगुरुनगरच्या तालुका क्रीडा संकुलात सकाळी १० वाजता होणार आहे.
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील चिखलगाव,खरपूड,कोयाळी तर्फे वाडा आणि रोहकल या महत्वपूर्ण चार ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या रविवारी (दि.१८) मतदान होत असून सरपंचपद हे जनतेतून असल्याने लोकनियुक्त सरपंचपदासह सदस्यांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात अक्षरशः कमालीचा रंगतदार झाला आहे.
तालुक्याच्या या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऐन पावसाळ्याच्या दिवसात आणि शेती कामाच्या काळात आल्याने प्रचारासाठी उमेदवारांना दिवसा वेळ कमी,त्यामुळे उमेदवारांनी रात्रीच्या प्रचाराला जोर दिलाय.प्रचारात आपला गाजावाजा दिसावा या साठी अनेक उमेदवारांनी वाहनांवर पोस्टर बाजी,घरांवर स्टिकर आणि स्पिकरद्वारे प्रचाराला जोर लावलाय.
मतमोजणी सोमवारी (दि.१९) राजगुरुनगरच्या तालुका क्रीडा संकुलात सकाळी १० वाजता होणार आहे.ईव्हीएम मशिनवर मतदान होणार असून जातवर्गनिहाय वेगवेगळ्या रंगांमध्ये मतपत्रिका असणार आहेत.प्रभागनिहाय एकाच ईव्हीएम मशिनवर पहिल्यांदा सरपंचपदाची मतपत्रिका, नंतर प्रभागनिहाय आरक्षित जागेनिहाय सदस्य मतपत्रिका आहे.मतमोजणी करिता पोलीस बंदोबस्त देखील कडेकोट असल्याची माहिती तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी दिली.
उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी दरकवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचासह सदस्यांची बिनविरोध निवड झाली.आता चिखलगाव,रोहकल,कोयाळी तर्फे वाडा आणि खरपूड अशा चार गावांच्या निवडणुकांच्या प्रचाराला अंतिम टप्प्यात प्रचंड वेग आला आहे.मतदारांची चंगळ सुरू आहे. मतदार आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवारांनी अनेक क्लुप्त्या लढवीत आहेत.परंतु मतदारराजा कोणाच्या पारड्यात मतदान टाकून कोणाला विजयी करणार हे येत्या १९ तारखेला मतदान मोजणी निकालानंतर स्पष्ट होईल.
-----------------------------★★★-------------------------
