गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना अटक

तीन गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, ६ मॅकझीनसह तब्बल ३० जिवंत काडतुसे जप्त केली. यामध्ये बुलेट गाडीचा समावेश असून, ‘एलसीबी’च्या पथकाने एक लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या दोघांना अटक

राजगुरूनगर : उत्तर पुणे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या (‘एलसीबी’) पथकाने रविवारी (दि. २०) रात्री धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये कुरकुंडी गावातील दोन पिस्तूलबहाद्दरांना बेड्या ठोकल्या. या आरोपींकडून तीन गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, ६ मॅकझीनसह तब्बल ३० जिवंत काडतुसे जप्त केली. यामध्ये बुलेट गाडीचा समावेश असून, ‘एलसीबी’च्या पथकाने एक लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आकाश आण्णा भोकसे (वय २३ ), महेश बाबाजी नलावडे हे (वय २३, दोघेही रा. कुरकुंडी, ता. खेड, जि. पुणे) अशी पिस्तूल बाळगणा-या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी)वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या आदेशानुसार खेड तालुक्यात खासगी वाहनाने गस्त (पेट्रोलिंग) घालत होते. दोन इसम काळ्या रंगाचे ‘बुलेट’वरून संशयास्पदरित्या शिरोलीगावाकडून किवळेच्या दिशेने जात आहेत, अशी माहिती गस्तीवर असलेल्या ‘एलसीबी’च्या पथकाला मिळाली. तसेच त्या दोघांकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

पोलिसांना खात्रीशीर मिळालेल्या माहितीनुसार ‘एलसीबी’ पथकाने बुलेटवर फिरणा-या दोघांना रोखले. त्यांची दोघांची अंगझडती घेतली असता आकाश भोकसे यांच्या कंबरेला खोचलेला दोन्ही बाजूस २ लोखंडी गावठी पिस्तूल भरलेल्या मॅकझीनसह मिळून आले. तसेच त्याचे पॅण्टच्या खिशात २ मॅकझीन जिवंत काडतुसे भरलेल्या मिळून आले. आकाश भोकसे याचा साथीदार महेश नलावडे याच्याही कंबरेला एक गावठी पिस्तूल भरलेल्या मॅकझीनसह मिळून आले. खिशात एक जिवंत काडतुसे भरलेली मॅकझीन मिळून आली. दोन्ही आरोपींकडून एकूण तीन गावठी पिस्तूल आणि तीन मॅकझीन प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे भरलेल्या आणि पिस्तूलमध्ये प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे भरलेली स्थितीत मिळून आली.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस फौजदार शिवाजी ननवरे, सहायक फौजदार गणेश जगदाळे, पोलीस हवालदार विक्रमसिंह तापकीर, पोलीस हवालदार विजय कांचन, पोलीस नाईक अमोल शेडगे, पोलीस नाईक बाळासाहेब खडके, पोलीस शिपाई धीरज जाधव, पोलीस शिपाई निलेश सुपेकर, पोलीस शिपाई दगडू वीरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.