अवघ्या १० दिवसांत बसथांबा उभारून अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थिनीला अनोखी श्रद्धांजली; कुरकुंडी फाटा येथे ‘अदिती राळे’ स्मृती बसथांब्याचे लोकार्पण
कुरकुंडी फाटा अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थिनी अदिती राळे हिला अनोखी श्रद्धांजली! सुनीता शरद बुट्टे पाटील यांच्या पुढाकारातून अवघ्या १० दिवसांत बसथांबा उभारला; मैत्रिणींच्या हस्ते लोकार्पण.
महावार्ता लाईव्ह | दहा दिवसांपूर्वी शिरोली-पाईट रस्त्यावरील कुरकुंडी फाटा येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनी कु. अदिती नवनाथ राळे हिचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर इतर विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याची तातडीने दखल घेत पुणे जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सदस्या सुनीता शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या निधीतून अवघ्या दहा दिवसांत या अपघातस्थळी सुरक्षित एसटी बसथांबा उभारला आहे. अदितीच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच तिच्या महाविद्यालयीन मैत्रिणींच्या हस्ते या बसथांब्याचे अत्यंत भावनिक वातावरणात लोकार्पण करण्यात आले.
कुरकुंडी (ता.खेड) येथील रहिवासी असलेली कु. अदिती राळे ही राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत होती. दहा दिवसांपूर्वी महाविद्यालयात जाण्यासाठी कुरकुंडी फाटा येथे बसची वाट पाहत असताना झालेल्या अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका होतकरू विद्यार्थिनीच्या जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

शिरोली-पाईट रस्त्यावरील कुरकुंडी फाटा येथे परिसरातील अनेक विद्यार्थी आणि विशेषतः विद्यार्थिनी मोठ्या संख्येने महाविद्यालयात जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहत उभ्या असतात. मात्र, या ठिकाणी निवारा नसल्याने आणि वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताचा धोका कायम होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्या सुनीता बुट्टे पाटील यांनी तातडीने पाठपुरावा करत जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध केला. केवळ दहा दिवसांच्या विक्रमी वेळेत येथे सुसज्ज बसथांबा बांधून पूर्ण केला. तसेच वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) देखील बसवण्यात आले आहेत. यामुळे आता विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना सुरक्षितपणे बसची वाट पाहता येणार आहे.
आज अदिती राळे हिचा दशक्रिया विधी पार पडल्यानंतर लगेचच या बसथांब्याचे लोकार्पण करण्यात आले. अदितीच्या आठवणींना उजाळा देत तिच्यासोबत शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या हस्ते फीत कापून हा बसथांबा प्रवाशांच्या सेवेत खुला करण्यात आला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

या लोकार्पणप्रसंगी अदितीचे वडील नवनाथ राळे, चुलते अरुण राळे यांच्यासह पुणे जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सदस्या सुनीता शरद बुट्टे पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश राक्षे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे, गणेश बोत्रे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश थिगळे, कुरकुंडी गावचे सरपंच नितीन भोकसे, किवळे गावच्या सरपंच जया संतोष कड, रमेश भोकसे, हेमंत काळे, अरुण काळे, नवनाथ काळे, हनुमंत राऊत, निलेश भोकसे यांच्यासह परिसरातील नागरिक, ग्रामस्थ आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दुःखाच्या प्रसंगातून सावरत भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उचललेल्या या तत्पर पावलाबद्दल स्थानिक ग्रामस्थ व पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.