धामणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने परस्पर पैसे काढले आणि भरले ? ग्रामसेवकाचा अपहार सरपंचांनीच आणला उघडकीस

धामणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने परस्पर पैसे काढले आणि भरले ? ग्रामसेवकाचा अपहार सरपंचांनीच आणला उघडकीस

राजगुरूनगर : प्रतिनिधी
खेड तालुक्यातील धामणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने सरपंचाच्या खोट्या सह्या करून साडेचार लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार सरपंचाने दिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला.त्यानंतर लगेच पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाची त्रिसदस्यीय समिती नेमून दप्तर तपासणी लावली.समितीमार्फत दप्तर तपासणी होण्याआधीच हे प्रकरण दडपण्यासाठी ग्रामसेवकाने २ लाख १७,७२७ रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यात भरल्याचे   बोलले जात आहे.पैसे काढायचे आणि उघडकीस आल्यावर पुन्हा भरायचे असा प्रकार घडत असताना प्रशासन ठप्प आहे.
     धामणे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक लालू बांबळे असून त्यांनी आपल्या खोट्या सह्या करून साडेचार लाखाचा अपहार केल्याची लेखी तक्रार सरपंच महेंद्र कोळेकर यांनी चाकण पोलीस स्टेशन व खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे दिली.तक्रारी अर्जानुसार गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी व दोन पंचायत विस्तार अधिकारी अशी त्रिसदस्यीय समिती नेमून दप्तर तपासणी लावली.अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने ग्रामसेवकाची घाबरगुंडी उडाली.सरपंच व गावचे काही ग्रामस्थांकडे जाऊन नोकरीचा प्रश्न म्हणून गयावया केली.त्यानंतर हे प्रकरण थेट एका बड्या नेत्यांकडे गेले.तेथे गेल्यावर ग्रामसेवकाचा अश्रूंचा बांध फुटला.माझी चुक झाली पैसे भरतो असा शब्द ग्रामस्थांना दिला.त्यानंतर लगेच ग्रामसेवकाने ग्रामपंचायतीच्या खात्यात पैसे भरले.समितीने दप्तर तपासणी होण्याआगोदरच ग्रामपंचायत खात्यात परस्पर पैसे भरले कसे असा प्रश्न निर्माण झाला.पैसे भरले म्हणजे अपहार केल्याचे सिद्ध होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
       धामणे व कोये या दोन ग्रामपंचायतीचा पदभार बांबळे ग्रामसेवकाकडे आहे.सरपंच कोळेकर यांनी ग्रामपंचायतीच्या बँक पासबुकाचे अपडेट ग्रामसेवकाकडे मागितले,परंतु त्यांनी देण्यास टाळाटाळ व उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सरपंचांनी स्वतः बँकेत जाऊन ग्रामपंचायत सर्व खात्यांचे स्टेटमेंट घेतले.स्टेटमेंट काढल्यानंतर चेकवर सही केली नसताना पैसे काढल्याचे सरपंचाच्या निदर्शनास आले.ग्रामसेवकाने पैशाचा अपहार केल्याची तक्रार सरपंच कोळेकर यांनी पोलिस स्टेशन चाकण व गटविकास अधिकाऱ्यांकडे दिली.त्यानंतर बीडीओ यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी व दोन पंचायत विस्तार यांची त्रिसदस्यीय समिती नेमून दप्तर तपासणी लावली आहे
---------------
गटविकास अधिकारी अजय जोशी यांना विचारले असता, नेमलेल्या समितीने दप्तर तपासणी करून अद्याप अहवाल पाठविला नाही.दप्तर तपासणी नंतर अपहार झाला की नाही हे स्पष्ट होईल.दोषी असल्यास कारवाई केली जाईल
.
-------------------
सरपंच महेंद्र कोळेकर यांना विचारले असता,ग्रामसेवकाने २ लाख १७,७२७ रुपये धामणे ग्रामपंचायत खात्यात भरल्याचे मोबाईलवर बोलताना सांगितले.

-----------------------------------------------------