बायकोचा खून, मुलावर चाकूहल्ला; आरोपीची आत्महत्या, भीमा नदीकाठी आढळला मृतदेह
राजगुरुनगरमध्ये पत्नीचा खून करून १७ वर्षीय मुलावर चाकूहल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या. चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
महावार्ता लाईव्ह | पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर १७ वर्षीय मुलावर चाकूहल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या खून प्रकारणातील आरोपीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेंद्र शिवाजी दौंडकर (वय ४५, रा. संगम गार्डन वाडा रोड, राजगुरुनगर) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह बुधवारी (दि. २ सप्टेंबर) सकाळी आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ३० ऑगस्ट) रात्री सुमारे अकराच्या सुमारास महेंद्र दौंडकर यांनी राजगुरुनगर येथील राहत्या घरात पत्नी दीपा यांचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांचा १७ वर्षीय मुलगा अथर्व याच्यावर चाकूने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, घटनेनंतर महेंद्र दौंडकर हे बेपत्ता होते. त्यांचा शोध घेतला जात असतानाच बुधवारी सकाळी चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी त्यांचा मृतदेह आढळून आला. नदीकाठी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह पोलिसांच्या निदर्शनास आला. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पत्नीचा खून आणि मुलावर केलेल्या हल्ल्यानंतर आरोपीने आत्महत्या केल्याने या संपूर्ण प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे.