कळमोडी धरणातून अराळा नदीत पाणी सोडले

कळमोडी धरणातून अराळा नदीत पाणी सोडले

राजगुरूनगर : न्यूज नेटवर्क

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील नागरिकांच्या मागणीवरून तसेच चास-कमान धरणातील पाणीसाठ्यात भर करण्यासाठी कळमोडी ( ता. खेड ) धरणातून आरळा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे.या पाण्याचा फायदा आरळा नदीतीरावर असलेल्या नागरिकांना पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आरळा नदीवर कळमोडी गावाजवळ १.५१ टीएमसी क्षमता असलेले हे धरण आहे. कमान धरणाच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या खेड तालुक्यातील गावांसह आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागाला या धरणाचा फायदा होतो. सद्यःस्थितीत या धरणात ७६.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कळमोडी धरणाखालील असणाऱ्या कळमोडी, चिखलगाव, साकुर्डी, कहू, कोयाळी यांसह अन्य गावाजवळून वाहणाऱ्या आरळा नदीचे पात्रात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही सोय होणार आहे. याशिवाय नदीकिनारी असणाऱ्या पाणीयोजनाही ऐन उन्हाळ्यात सुरू राहणार आहेत. धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा साठा शिल्लक ठेवून उर्वरित पाणी चास-कमान धरणात सोडणार असल्याचेही सांगण्यात आले.

---------------------------------------------------------------------