‘पीडीसीसी’ बँक निवडणुकीपूर्वीच सातकर गटाला मोठा धक्का ; राजगुरूनगरच्या सोसायटीवर दिलीप मोहिते पाटलांच्या शिलेदाराची बाजी

प्रतिनिधीपदी अमोल सांडभोर पाटील यांची बिनविरोध निवड; सातकर गटाला धक्का, माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांची ताकद वाढली ;

‘पीडीसीसी’ बँक निवडणुकीपूर्वीच सातकर गटाला मोठा धक्का ; राजगुरूनगरच्या सोसायटीवर दिलीप मोहिते पाटलांच्या शिलेदाराची बाजी

 

महावार्ता लाईव्ह | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजगुरुनगर येथील १९१८ सालची स्थापना असलेल्या सिद्धेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतून पीडीसीसी बँकेसाठी प्रतिनिधी निवडणुकीत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे खंदे समर्थक व सिद्धेश्वर सोसायटीचे उपाध्यक्ष अमोल वसंतराव सांडभोर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोसायटी स्थापना ते अनेक दशकांपासून या सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या सातकर गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

 

अमोल वसंतराव सांडभोर यांची प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.या निवडणूक प्रक्रियेत मुख्यतः  सोसायटीचे उपाध्यक्ष अमोल सांडभोर पाटील, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, माजी सभापती नवनाथ होले, सरपंच विजय थिगळे, बाळासाहेब जैद, भगवान मांजरे आणि सुंदराबाई वेहळे, यांची सभागृहात उपस्थिती होती. निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी तथा सचिव कुमार राळे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.१९) रोजी पार पडली. दरम्यान,मोहिते पाटील विरोधी गटातील संचालक व माजी सभापती हिरामण सातकर, खंडेराव थिगळे आणि सुनिता सातकर हे बैठकीस अनुपस्थित होते.

 

घरच्याच मैदानात सातकरांची पिछेहाट

सहकार महर्षी व माजी आमदार कै. साहेबराव सातकर यांचे सुपुत्र हिरामण सातकर हे जिल्हा बँकेच्या 'अ' वर्ग गटातून पुन्हा पीडिसीसी बँकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. बँकेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी सिद्धेश्वर सोसायटीच्या अधिकृत प्रतिनिधी पदावर त्यांची निवड होणे अनिवार्य होते. मात्र, सोसायटीच्या संचालक मंडळात मोहिते पाटील गटाने अंतर्गत पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी करत आवश्यक संख्याबळ स्वतःच्या बाजूने वळवले आणि आपल्या कट्टर समर्थकांची प्रतिनिधी म्हणून निवड केली.

 

ऐनवेळी माघार घेण्याची नामुष्की

संचालक मंडळात मोहिते पाटील गटाचे वाढलेले पारडे आणि स्वतःकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, हिरामण सातकर यांना प्रतिनिधी पदाच्या निवडणूक रिंगणात उतरले नाही. त्यामुळे अमोल वसंतराव सांडभोर पाटील यांची पीडिसीसी बँकेसाठी मतदार प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष,बाजार  समितीचे माजी सभापती व जिल्हा सहकारी बोर्डावर अध्यक्ष म्हणून कार्य केलेले हिरामण सातकर यांना स्वतःच्याच घरच्या सोसायटीतून पीडिसीसी बँकेला मतदार प्रतिनिधी म्हणून जाता न आल्याने खेड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

मोहिते पाटील गटाचे पारडे जड

सिद्धेश्वर सोसायटीवर अनेक वर्षांपासून सातकर गटाच्या विचारांचेच प्रतिनिधी निवडून येत होते. हा गड खेचून आणत दिलीप मोहिते पाटील यांच्या शिलेदाराने विजय मिळवल्याने पीडीसीसी बँकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी तालुक्यात मोहिते पाटील गटाचे राजकीय वजन लक्षणीयरीत्या वाढले आहे, तर दुसरीकडे सातकर गटाच्या जिल्हा बँकेच्या गणितांना मोठा सुरुंग लागला आहे.सातकर गटाला "जोर का झटका धिरेसे" देत मोहिते पाटलांनी सिद्धेश्वर सोसायटीवर वर्चस्व मिळविले.