खेड तालुक्यात बिबट्याची दहशत

मानवी परिसरात बिबट्याचा वावर व उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

खेड तालुक्यात बिबट्याची दहशत

राजगुरूनगर : खेड तालुक्यात बिबट्याचे मानवी जीवांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत चालले असून हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.मानवी परिसरात बिबट्याचा वावर व उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मानवी जीवांवर बिबट्याचे हल्ले होऊ नये म्हणून शासनाच्या वन विभागाने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्याच्या अनेक भागात सध्या उसाची तोड होत असल्याने बिबट्याचे राहण्याचे सुरक्षित ठिकाणी नष्ट होत असल्याने पाण्याच्या व भक्ष्यासाठी जंगलातील बिबटे जंगलाचा भाग सोडून वाड्यावस्त्यांसह शहरी भागाच्या परिसरात बिनधास्तपणे येऊ लागले आहेत.तालुक्यात आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात तीनचार जणांचा मृत्यू झाला.तर पशुधनाची हत्या भरमसाठ झाली आहे.काही वर्षापूर्वी वाकी तर्फे वाडा येथील सइंद्राबाई पोमन तर मागील दोन वर्षांपूर्वी वडगाव पाटोळे येथील ५० वर्षीय जनाबाई वामन गडदे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.तर १९ जानेवारी २०२३ रोजी भिवेगाव येथील ५५ वर्षीय शेतकरी लक्ष्मण रामभाऊ वनघरे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. बिबट्याच्या सततच्या हल्ल्यामुळे माणसे व जनावरे मृत्यूमुखी पडत आहेत.यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीमय वातावरण आहे.

आठ महिन्यांपूर्वी रेटवडी येथे आंब्याच्या झाडाआड दाबा धरून बसलेल्या बिबट्याने घरातील आंगणासमोर खेळत असलेल्या साडेतीन वर्षीय साईश दत्तात्रय पवळे या चिमुकलीच्या मानेवर झडप घालून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.तसेच रेटवडी येथेच दीड तासाच्या अंतराने दोन बिबट्यानी दोन महिलांवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला केला होता.तर जऊळके येथील लता शिवाजी बोऱ्हाडे या शेतात जात असताना उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.तर जैदवाडी येथे एका महिलेच्या अंगावर बिबट्याने झडप घालून जखमी केले होते.अशा अनेक घटना खेड तालुक्यात घडल्या आहेत.

ग्रामीण व शहरी भागात बिबट्याचा वावर गेल्या काही  वर्षांपासून दिसून येत आहे.१० महिन्यांपूर्वी चाकण एमआयडीसी मर्सिडीज बेंज या बहुराष्ट्रीय कंपनीच्या आवारात बिबट्या आढळला होता.तर नानेकरवाडी फाट्याजवळ एका वाहनाने बिबट्याला धडक दिल्याने जखमी अवस्थेतील बिबट्याने चवताळून एका महिलेवर हल्ला करून जवळच्याच आयएआय या कंपनीच्या समोर पत्रा शेडमध्ये दडून बसला असता या बिबट्यांना वन विभागाने जेरबंद केले होते.अशा अनेक घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या असून याकडे वन विभागाने दक्ष राहून आणि बिबट्याचा वावर ठिकाणी पिंजरे लावण्याची गरज आहे.आतापर्यंत खेड तालुक्यात ३८ गावांमध्ये बिबट्याने जनावरांवर हल्ले करून फस्त केले.राजगुरूनगर व चाकण वन विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे.  

  --- मानव-बिबट्या संघर्ष ---

वाघाप्रमाणे बिबट्यामध्ये खूप मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याची क्षमता नसते.त्याच्या शिकारीच्या कुवतीमधील प्राणी मानवी वस्तीमध्येच सापडतात.यामध्ये कुत्रे,बकरी, डुक्कर,मोकाट गुरे,कमी प्रतिकार क्षमता असलेले प्राणी हे त्याचे खाद्य असते.त्यामुळे बिबट्याचे मानवी वस्तीकडे घुसण्याचे प्रकार वाढले आहे.यातच दाट जंगलाची घटलेली संख्या,तेथे लहान प्राण्यांचे कमी झालेले अस्तित्व आणि जंगलाच्या जवळ सरकलेली वस्ती यामुळे खेड तालुक्यात बिबट्याचा वस्ती लगतचा वावर वाढला आहे.त्यामुळे साहजिकच खेड तालुक्यात सध्यातरी बिबट्या आणि मानव यांच्यात संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे.