सप्तहिंदकेसरी मन्याच्या पराक्रमाची चित्रफीत पाहून अनेकांना अश्रू अनावर
सप्तहिंदकेसरी मन्याच्या दशक्रियेला प्रचंड गर्दी ; मन्याभाईच्या स्मरणार्थ राजेश जवळेकर रुग्णवाहिका देणार
सप्तहिंदकेसरी " मन्या " च्या दाशक्रियेला जमलेला जनसमुदाय
Seeing the footage of Saptahindkesari Manya's prowess, many people shed tears
राजगुरुनगर : वाफगाव (ता.खेड) येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक राजेश वसंतराव जवळेकर यांच्या सप्तहिंदकेसरी "मन्या" बैलाचे निधन झाले होते.मन्याचा दशक्रियाविधी धार्मिक पध्दतीने पार पडला. त्याच्या दशक्रियाविधीला पुणे,अहमदनगर जिल्ह्यातील बैलगाडा मालक व गाडाशौकीनांचा प्रचंड जनसमुदाय जमला होता.हजारो लोकांच्या तुफान गर्दीने मन्या बैलाचा दशक्रियाविधी कार्यक्रम अक्षरशः जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.मन्याच्या पराक्रमाची चित्रफीत पाहताना गाडामालक व गाडाशौकीन अक्षरशः रडले.
२६ फेब्रुवारीला मन्या बैलाचे निधन झाल्यानंतर बुधवारी (दि.६) दहाव्या दिवशी दशक्रिया विधी झाला.जवळेकर बंधूनी "मन्या" बैलाचा पूर्णकृती पुतळा उभारून स्मारक बांधले. पुतळ्याला बैलगाडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी हार घालून श्रद्धांजली वाहिली.यावेळी मन्याचे घाटातील बारीच्या आठवणीची चित्रफित दाखवण्यात आली.त्याच्या पराक्रमाची चित्रफीत पाहताना जनसमुदायाचे डोळे पाणावले तर काही जण अक्षरशः रडत होते.मन्याने बैलगाडा शेतातील अनेक सर्वाच्च किताब मिळवले होते.यामध्ये ८०० वेळा घाटाचा राजा,१५० पेक्षा अधिक दुचाकी,५ चारचाकी वाहने,२ ट्रॅक्टर,१ जेसीबी तसेच अनेक शेकडो चषक मिळाले होते अशा अनेक पुरस्कारांचा तो मानकरी ठरला होता.मन्याने जवळेकर यांचे नाव जिल्ह्यात प्रसिद्ध केले.
यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव,भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद,मंचर बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम,जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर,भाजपाचे संपर्क प्रमुख जयसिंग एरांडे,मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे,माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदल,अतुल देशमुख,बाबाजी काळे, खेड बाजार समिती सभापती कैलास लिंभोरे,संचालक विजयसिंह शिंदे,सरपंच गणेश काळे,जयसिंग भोगाडे,माजी महापौर राहुल जाधव,राजगुरुनगर बँकेचे संचालक राहुल तांबे,हिरामण सातकर, प्रकाश वाडेकर तसेच बैलगाडा क्षेत्रातील गाडामालकांसह गाडाशौकीन व अन्य जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अश्रू अनावर होत असल्याच्या स्थितीत राजूशेठ जवळेकर यांनी सर्वांचे आभार मानले. मन्याच्या - स्मरणार्थ शर्यतीतील बैलगाडा घाटात जखमी बैलांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी अद्ययावत रुग्णवाहिका देण्याची घोषणा राजूशेठ जवळेकर यांनी केली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा लवकरच करण्यात येईल असे जवळेकर म्हणाले. राजेंद्र टाकळकर, माऊली पिंगळे, संतोष गार्डी यांनी सूत्रसंचालन केले.
