खेड तालुक्यात लहान बालकांच्या औषधांचा तुटवडा

खेड तालुक्यात पाच महिन्यापासून निमोनिया प्रतिबंधक ( पी.सी.व्ही. ) लसीचा तुटवडा

खेड तालुक्यात लहान बालकांच्या औषधांचा तुटवडा

राजगुरूनगर : खेड तालुक्यात १४३ कुपोषित बालक असताना गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक औषधांचा तुडवडा भासत आहे. एक धक्कादायक बाब म्हणजे एक वर्षाच्या आतील लहान बालकांना वयाच्या नऊ महिने पर्यंत देण्यात येणारी अतिशय महत्त्वाची निमोनिया प्रतिबंधक (पी.सी.व्ही) लसीची तालुक्यात गेल्या चार पाच महिन्यापासून तुटवड्याची भर पडल्याने देशाचे भावी आधारस्तंभ म्हणून समजले जाणारे बालकांना या लसीपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनीया बॅक्टेरियामुळे हा आजार होतो. यामुळे श्वसनमार्गाला संसर्ग होऊन फुप्फुसाला सूज येते. गंभीर न्यूमोनिया होण्याचा धोका बालकांमध्ये दिसून येतो. संसर्गामुळे एक वर्षाच्या आतील मुलांमध्ये डायरिया व  न्यूमोनिया होऊन ते दगावण्याचा धोका असतो.यामुळे पी.सी.व्ही प्रतिबंधक ही लस देण्यात येते परंतु खेड तालुक्यात या लसीचा खूप प्रमाणात तुडवडा निर्माण झाल्याची गंभीरबाब समोर आली आहे.

दीड,साडेतीन,नऊ महिन्याच्या लहान बालकांना पोलिओ, रोटा ,पॅंटा, आय.पी.व्ही या नियमित देण्यात येणाऱ्या लसी मध्ये पी.सी.व्ही लस देण्यात येतात परंतु तालुक्यातील शासकीय दवाखान्यात तीन ते चार महिन्यापासून पी.सी.व्ही या लसचा तुटवडा जाणवत आहे. लहान बालकांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

खेड तालुक्यातील १० प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. नियमितपणे लसीकरणासाठी आरोग्य केंद्र,आंगवाडी, शाळा आशा ठिकाणी लस देण्यात येते परंतु सध्या बाकीच्या लस मिळत असताना पी.सी.व्ही ही लस मिळत नसल्याने निराश होऊन मागे परतावे लागत आहेत. पालकांमध्ये आपल्या मुलांच्या आरोग्याची भीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.पालकांमध्ये असंतोषाची भावना तयार होत असून पालकांनी कर्मचारी यांना लस उपलब्ध केव्हा होणार हे विचारले असता आज किंवा पुढील महिन्यात मिळेल,आम्हाला उपलब्ध झाल्यावर सांगतो अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.परंतु पालक पुढील महिन्यात बालकांना लस देण्यासाठी जातात तेव्हा प्रत्यक्षात लस उपलब्ध झालेली नसते. 

जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांना मोबाईलद्वारे संपर्क केला असता वैद्यकीय अधिकारी यांच्या मागणीनुसार आम्ही लसीचा पुरवठा करत असतो.आढावा घेऊन लसीचा पुरवठा करू असे सांगण्यात आले.खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विधाते यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क केला असता त्यांनी मिटिंगमध्ये असल्याचे कारण सांगून कार्यालयातील कर्मचारी महांकाळे यांच्याशी संपर्क साधा असे सांगून आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलली.
आरोग्य विभागाचे सुपरवायझर भूषण भरती यांनी सांगितले की जिल्हाकडे तुडवडा असल्याने तालुक्याला पी.सी.व्ही लस कमी प्रमाणात मिळत आहे.