Khed | राजगुरूनगर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
राजकीय हालचाली वाढल्या; उत्सुकता शिगेला
Rajgurungar nagarparishad
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्याचे लक्ष वेधून घेतलेल्या व 'हायव्होल्टेज' नगरपरिषद म्हणून ओळख असलेल्या राजगुरूनगर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक अवघ्या पाच दिवसांवर आली आहे सोमवारी (दि.१२) रोजी उपनगराध्यक्ष पदाची निवड निवड होणार निश्चित आहे.
उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. अनेक इच्छुक नवनिर्वाचित नगरसेवक उपनगराध्यक्ष पदाच्या रांगेत उभे आहेत .मात्र, एवढे जरी असले तरी तालुक्यातील शिवसेना नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांचे विश्वासू सहकारी नगरसेवक मनोहर सांडभोर यांच्या गळ्यातच ही माळ पडणार, अशी चर्चा शहरात आहे. त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत.
तालुक्यात राजगुरूनगर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत अटीतटीच्या वातावरणात नऊ वर्षाच्या कालावधीनंतर पार पडली.त्यात अतुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेसेनेचे १०, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ५ व भाजपचे माजी नगराध्यक्ष शिवाजी मादळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे ४, तर अपक्ष २ असे एकूण २१ नगरसेवक निवडून आले आहेत.नगराध्यक्षाची निवड ही जनतेतून झाल्याने शिंदेसेनेचे मंगेश गुंडाळ हे नगराध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत.
दरम्यान, राजगुरूनगर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून दोघांना संधी मिळणार आहे. त्यासाठीही आपापल्या नेत्यांकडे संबंधितांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. ते दोन भाग्यवान कोण? याचीही उत्सुकता शिगेला पोचली आहे. दरम्यान, नूतन नगराध्यक्षांना पदभार घेण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. त्या पार्श्वभूमीवर नूतन नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ हे सोमवारी (ता. १२) पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
